अकोलेत उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप

अकोलेत उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोलेकरांनी अतिशय उत्साही, भक्तीमय व भावपूर्ण वातावरणात तसेच अधून मधून येणार्‍या पावसाच्या साक्षीने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतता पूर्ण वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.

करोनामुळे मागील दोन वर्षे कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने निर्बंध घातले होते. यावेळी धार्मिक सण, उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

अनेक वर्षाची परंपरा राखीत अकोले महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाचे 250 स्वयंसेवक व अकोले नगरपंचायत च्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य दान स्वीकारण्याची प्रवरा नदी जवळ दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. दशक्रिया विधी येथे 1148 व सेतू पूल येथे 374 अशा एकूण 1522 छोट्या मोठ्या गणेश मुर्त्या संकलन तर दीड ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले.

निळवंडे धरणातून 4385 क्यूसेक ने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने अगस्ति सेतू पूल पाण्याखाली गेला होता. या पार्श्वभूमीवर अकोले नगरपंचायतच्या आरोग्य विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रवरा नदी पात्राला बॅरेकेट्स लावले होते.

मॉडर्न हायस्कूल व ज्युनि कॉलेज, ज्ञानवर्धिनी बालक मंदिर व प्राथमिक शाळेने प्राचार्य एस. के. कचरे, उपप्राचार्य प्रा. दीपक जोंधळे, पर्यवेक्षक सविता मुंदडा आदींच्या नेतृत्वाखाली ढोल पथक, टिपरी, आदिवासी नृत्य, लेझिम, झांज पथक, मर्दानी खेळ, स्त्रीयांवर होणारे अत्याचार पथनाट्य मिरवणुकीत सादर करत अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.

अगस्ति विद्यालयाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकी निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी केली होती. अगस्तीची मिरवणूक परंपरे प्रमाणे शिस्तबद्ध व अकोलेकरांचे विशेष आकर्षण ठरली. अगस्ति शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतिश नाईकवाडी, शिरीष नाईकवाडी, मुख्याध्यापक शिवाजीराव धुमाळ यांचेसह सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पांढरे शुभ्र कुर्ते, शिक्षिकांनी एक सारख्या साड्या व फेटे परिधान केले होते. शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम अकोलेकरांचे पसंतीस उतरले. सुमारे तीन ते साडे तीन तास नगरपंचायत जवळ हे कार्यक्रम सुरू होते. आदिवासी नृत्य, भारतीय लेझीम, लाठी काठी फिरविणे, पथ नाट्य यांचेसह विविध कार्यक्रमांचे सुरेख नियोजन अगस्ति विद्यालयाचे वतीने करण्यात आले होते.

अकोले नगरपंचायत च्या वतीने सर्व गणेशभक्त यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, माजी नगराध्यक्षा संगिताताई शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती शरद नवले, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती हितेश कुंभार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रतिभाताई मनकर, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती वैष्णवीताई धुमाळ, नगरसेविका शितल वैद्य, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, तमन्ना शेख, नगरसेवक सागर चौधरी, नवनाथ शेटे, आरिफ शेख, विजय पवार, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, परशुराम शेळके, विजय सारडा, आर्किटेक्ट चेतन नाईकवाडी, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, हिंद सेवा मंडळाचे सहसचिव योगेश देशमुख, संचालक दिलीप शहा, मॉडर्न ज्युनि कॉलेजचे अध्यक्ष सतिश बुब, निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले, सहा.पो.निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक हंडोरे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, पत्रकार संघाचे सचिव अल्ताब शेख, बांधकाम विभागाच्या अभियंता सौ. कुलकर्णी, श्रीमती उगले, विभाग प्रमुख उत्तम शेणकर, राहुल मंडलिक, सतीश नाईकवाडी, श्री. पटेल, आदेश नाईकवाडी, अमोल मंडलिक, मच्छिन्नद्र लोखंडे, साबीर सय्यद, सोमनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वात अगोदर माहेश्वरी युवा महेश मित्र मंडळाने विसर्जन केले. त्यापाठोपाठ अकोले ग्रामीण रुग्णालय, महालक्ष्मी मित्र मंडळ, खटपट नाका मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, नाईकवाडी नगरचा राजा मित्र मंडळ क्रांती कला व क्रीडा मंडळ नवलेवाडी, सह्याद्री क्रांती प्रतिष्ठान नवलेवाडी अशा पद्धतीने मंडळांनी श्री गणरायाची मिरवणूक काढली व लाडक्या बाप्पाला निरोप दिला. प्रशासनाच्या निर्धारित वेळेआधीच पाच मिनिटे सर्व गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक संपली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अकोले पोलीस ठाणे व गृहरक्षक दलाचे जवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com