अकोले : विनाकारण फिरणार्‍यांची सक्तीने रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट

अकोले : विनाकारण फिरणार्‍यांची सक्तीने रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट

अकोले (प्रतिनिधी) - अकोले शहरासह आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा परिणाम आरोग्य विभागासह प्रशासनावर ताण वाढत आहे. यावर अकोले व राजुर पोलिसांनी अनोखी कारवाई सुरू केली आहे. विनाकारण घरातून बाहेर पडणार्‍या व्यक्ती यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.

काल सोमवारी अकोले व राजूर मध्ये विनाकारण फिरणार्‍यांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. यामुळे आपली करोना टेस्ट पॉझिटिव्ह येते की काय या भीतीपोटी फिरणार्‍यांची संख्या आता कमी होणार आहे.परिणामी करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

राज्यात वाढत्या करोना प्रादुर्भावाचाफटका शहरी भागासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. शहरी भागातून आता ग्रामीण भागातही करोनाने थैमान घातले आहे. अकोले सह राजूर सारख्या आदिवासी, अतिदुर्गम भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य विभाग, नगर पंचायत व पोलीस प्रशासन कंबर कसून सज्ज झाले आहे.

आता विनाकारण घराबाहेर मोकाट फिराल तर राजूर व अकोले पोलिसांकडून रॅपिड अँटीजेन टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. या टेस्ट मध्ये मोकाट, विनाकारण फिरणार्‍यांमधून ज्या व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह येणार त्याची आता थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे.

याचा त्रास फिरणार्‍या व्यक्तींच्या घरच्यांना देखील होणार आहे. संपूर्ण कुटुंबाची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. तेव्हा विनाकारण फिरणार्‍यांनो आता सावधान, घरात बसा नाहीतर होईल रॅपिड अ‍ॅन्टीजेनची टेस्ट, मग इथे कुणालाही सोडले जाणार नाही असा इशारा अकोले व राजूर पोलिसांनी जनतेला दिला आहे.

या टेस्ट साठी राजूर येथे डॉ. दिघे व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले तर अकोले मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे टेक्निकल स्टाफ संतोष चौधरी व त्यांचे सहकारी तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.

या रॅपिड अ‍ॅन्टीजेट टेस्ट करण्यासाठी काही पत्रकार मंडळी ही स्वतः हुन पुढे आली आहे तर काही नागरिक या संधीचा लाभ घेत आहे. याचेही समाजातून स्वागत होत आहे. त्यामुळे करोना रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू होऊन पुढील होणारा त्रास वाचणार आहे.

अकोले येथील महात्मा फुले चौक व ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेत एकूण 65 विनाकारण फिरणार्‍याची करोना टेस्ट केली त्यामध्ये 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. तर राजूर येथे 25 व्यक्तींची टेस्ट केली असता ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. या मोकाट फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com