मजुरांअभावी ‘त्यांनी’च उचलले कोव्हिड सेंटर मधील बेड

मजुरांअभावी ‘त्यांनी’च उचलले कोव्हिड सेंटर मधील बेड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मजुरांची सर्वत्र टंचाई जाणवू लागली आहे.

याचाच फटका दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या अगस्ति आश्रमातील कोव्हिड सेंटरलाही बसला. बेड वाहण्यासाठी मजूर मिळत नसल्याने थेट महसूल, आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनीच आपल्या निवडक कर्मचार्‍यांच्या मदतीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 75 बेड हे दुसर्‍या मजल्यावर वाहून नेले. सामाजिक बांधिलकीतून काम करत असलेल्या त्या अधिकारी व कर्मचारी यांचे बेड वाहत असल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.

त्याचे असे झाले की, अगस्ती आश्रमातील कोव्हिड सेंटरचा अलीकडेच शुभारंभ झाला. पहिल्या मजल्यावर 70 बेड व दुसर्‍या मजल्यावर 75 असे 145 बेडचे नियोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी 70 बेड खालील मजल्यात ठेवण्यात आले, पहिल्या दिवशीच ते बेड फुल्ल झाले व उर्वरित 75 बेड भक्तनिवास परिसरात येऊन पडले होते. अशातच अकोले शहरासह तालुक्यात सुरू झालेले शासकीय व खासगी कोव्हीड सेंटर हाउसफुल्ल झाले. रुग्णांना बेड मिळणे मुश्किल होऊन बसले होते.

अगस्ति आश्रम येथील कोव्हिड सेंटर येथे काही रुग्ण येऊन बेड लावण्यासाठी मजुरांची वाट पाहत होते. ज्या व्यापार्‍यांमार्फत हे बेड खरेदी केले गेले, त्यांनी तेथे बेड आणून टाकले पण त्यांचे कर्मचारी करोनाच्या वाढत्या भीतीमुळे बेड खालून वर उचलायला तयार होत नव्हते. कारण तेथे रुग्ण वाढू लागले होते. पैसे देऊन जवळपास मजूर मिळत नसल्याने अधिकार्‍यांची मोठी अडचण झाली.

नवीन रुग्ण वाढत असल्याचे पाहून स्वतः खानापूर कोव्हिड सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. शामकांत शेटे, अकोलेचे मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी प्रवीण ढोले व कोतवाल विनायक वडजे, नितेश गायकवाड, गणपत कोल्हाळ, तुषार कोतवाल, संदीप दौंड यांच्या मदतीने 75 बेड दुसर्‍या मजल्यावर उचलून नेले व तेथे हे बेड सुस्थितीत लावले. हे फोटो व व्हिडीओ शूटिंग उपस्थित रुग्णांपैकी कुणी तरी मोबाईलमध्ये घेतली. व नंतर सोशल मीडियावर हे सगळे चित्र पहावयास मिळाले. समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईकांकडून या अधिकारी, कर्मचारी वर्गाचे अभिनंदन व आभाराच्या पोस्ट समाज माध्यमातून झळकू लागल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com