24 तासात अकोलेत तब्बल 595 रुग्ण

30 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय
24 तासात अकोलेत तब्बल 595 रुग्ण

अकोले |प्रतिनिधी| Akole

जिल्ह्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना अकोले तालुक्यात मात्र करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरुवार 13 मे रोजी अकोले तालुक्यात तब्बल 595 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात सलग दोन दिवस अकोले तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे धास्तावलेल्या अकोलेकरांनी शनिवार दि. 15 मे पासून 30 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

अकोले तालुक्यात मागील वर्षी मे 2020 पर्यंत एकही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. गतवर्षी च्या तुलनेत यावर्षी करोना रुग्णांची संख्या मात्र वाढलेली दिसत आहे. आत्ता पर्यंत तालुक्यात 50 हजारच्या आसपास करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये रॅपिड अँटीजन 24 हजार 989 तर आर टी पी सी आर 23 हजार 47 इतक्या चाचण्यांमध्ये 9 हजार 426 करोना बाधित आढळले. तर सद्यस्थितीत 7 हजार 951 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.तर शासकीय आकडेवारी नुसार करोनाने 108 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 1 हजार 367 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 668 रुग्ण कोविड केअर सेंटर मध्ये दाखल असून 502 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. ऑक्सिजन कोविड केअर सेंटर मध्ये 39 तर खासगी रुग्णालयात 117 रुग्ण उपचार घेत आहेत.

अकोले तालुक्यात अकोले, राजूर, समशेरपूर व कोतुळ हे चार ग्रामीण रुग्णालये, 11 प्राथमिक आरोग्य केंद्र तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 70 व 4 फिरते पथक कार्यान्वित आहे. तालुक्याच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहे. तर करोना ची असणारी भयंकर लाट पाहता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असताना मात्र लसीकरणाचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसत आहे. यामुळे करोनाची लाट थोपविण्यामध्ये हा सगळ्यात मोठा अडसर ठरत आहे. तर शहरी भागामध्ये दिसणारे करोनाचे रुग्ण आता तालुक्याच्या आदिवासी, डोंगराळ व दुर्गम भागातही आढळून येत असल्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com