करोना
करोना
सार्वमत

अकोलेत करोनाच्या रुग्ण संख्येत पाचने वाढ

एकूण बाधित 54 ; प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येत गुरुवारी कळंब व बहिरवाडी येथील प्रत्येकी एक आणि अकोलेतील तीन अशा पाच रुग्णांची भर पडली. त्यात एका राजकीय पक्षाच्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्याचा समावेश आहे.

त्यामुळे बाधितांची संख्या आता 54 झाली आहे. दरम्यान अकोले शहरात व्यापार्‍यांची बैठक झाली. त्यात प्रत्येकाने आपल्या सोयीने आजपासूनच दुकाने सुरू करण्याचा निर्णय झाला.त्यानंतर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ केली आहे.

अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील कळंब येथील 42 वर्षीय व्यक्ती व बहिरवाडी येथील 41 वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा अकोले शहरातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

एका राजकीय पक्षाचा शहरातील प्रमुख कार्यकर्ता (वय 38), कारखाना रोड येथील एक 24 वर्षीय युवक आणि खंडोबा माळ परिसरातील तरुण शेतकरी अशा तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

त्यामुळे शहरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शरातील रुग्णांची संख्या 4 झाली आहे. हे चारही रुग्ण महात्मा चौक ते परखतपूर या परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांची चिंता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कारखाना रोडवर कंटेन्मेंट झोनची संख्या वाढणार आहे.

बहिरवाडी येथील 41 वर्षीय व्यक्तीचा खाजगी प्रयोग शाळेतील अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्याने नाशिक येथे प्रवास केला होता. तो ग्रामीण रुग्णालयात येण्यापूर्वी जवळपास आठ दिवस शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता.

त्यामुळे आता त्याच्या संपर्कातील त्या रुग्णालयाचे डॅाक्टरचे स्वॅब तपासणी होऊन क्वारंटाईन केले जाणार आहे. तसेच सदर व्यक्ती काही दिवस सुगाव येथील नातेवाईकाकडेही राहिला असल्याचे समजते. कळंब व बहिरवाडी ही गावे कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे.

अद्याप शहरातील बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह तालुक्यातील करोनाच्या 40 संशयितांचे अहवाल येणे बाकी आहे.तालुक्यातील एकूण 54 पैकी 31 जण बरे झाले असून 21 जणांवर उपचार सुरू आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली.

रात्री उशिरा समजलेल्या माहितीनुसार अकोलेतील त्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी असलेल्या मंडळींचे व त्यांचे घरच्या लोकांच्या स्वॅबचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला असून सुदैवाने ते सर्व जण निगेटिव्ह आले आहेत.

अकोले शहरातील व्यापारी असोसीएशन, सर्व राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी दि. 14 ते 20 जुलै पर्यंत अकोले शहर बंदचा निर्णय घेतला होता. मात्र व्यापार्‍यांत याबद्दल दोन गट पडल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे शहरातील काही व्यापार्‍यांची काल बैठक पार पडली. त्यामध्ये बंद काळात मोठ्या व्यापार्‍यापेक्षा छोट्या व्यापार्‍यांचे अधिक नुकसान होत आहे. त्यामुळे बैठकीतील सूर लक्षात घेता आजपासूनच प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे प्रशासनाने देखील कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या महात्मा फुले चौकापासून संगमनेर रोडवरील श्रीराज एंटरप्रायजेस, राजूर रोडवरील हॉटेल जय महाराष्ट्र पर्यंत देवठाण रोडवर लहामगे कॉम्प्लेक्स पर्यंतचा 200 मीटरचा परिसर बफर्स झोन जाहीर केला आहे.अकोले नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी याठिकाणी हद्द निश्चित करण्यासाठी सफेद पट्टे मारले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com