करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

अकोले तालुक्यात करोनाचे 6 रुग्ण

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

तालुक्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काल बुधवारी तालुक्यात 6 करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 47 झाली आहे. त्यापैकी 37 जण करोनामुक्त झाले तर 9 रुग्णांवर उपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालांत देवठाण येथील 80 वर्षीय महिलेचा अहवाल करोना पॅाझिटीव्ह आला असल्याची माहिती सकाळी अकोलेत प्राप्त झाली. सदर महिला पूर्वीच्या बाधित महिलेच्या संपर्कातील आहे. तर काल बुधवारी दुपारी आलेल्या अहवालात तालुक्यातील पाच रुग्ण करोना बाधित आढळले आहेत.

यामध्ये तालुक्यातील चास येथील 39 व 65 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगी अशी चार तर उंचखडक येथील 65 वर्षीय पुरूष अशा पाच जणांचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

अकोले तालुक्यात सुरूवातीला करोनापासून सुरक्षित राहिल्यानंतर मे-जून महिन्यापासून तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यातील रोज वेगवेगळ्या गावांत रुग्ण आढळून येत आहे. तसेच शहरातही कारखाना रोड भागात करोना रुग्ण आढळून आला आहे.

यामुळे शहरात भीतीचे वातावरण असून अकोलेकरांनी सात दिवसांसाठी अकोले शहर बंदही ठेवण्यात आले आहे. त्या बाधितांच्या संपर्कातील शहरातील 24 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर येथील प्रयोगशाळेत नेण्यात आले आहेत. या स्वॅबच्या अहवालांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

समाधानाची बाब म्हणजे करोनाशी लढा देऊन बरेही होत आहे. काल समाधानाची गोष्ट म्हणजे पिंपळगाव निपाणी येथील तरुण कांदा व्यापारी व त्यांची पत्नी व ब्राम्हणवाडा येथील 5 अशा एकूण 7 जणांनी करोनावर मात केली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून मुक्त करण्यात आले.

देवठाण येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार अकोले देवठाण येथे मागील आठवड्यात करोना बाधित महिला आढळून आली. तिच्या संपर्कात आलेल्या 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने या परिसरातील संपूर्ण रस्ते बंद केले आहेत. गावात एक विवाह होणार होता. त्या लग्नाच्या निमित्ताने पाहुणे आले होते. त्यातील महिलेला त्रास होऊ लागल्याने तिला तपासून घेण्यात आले आहे.

मागील आठवड्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कात आलेल्या चौदा लोकांची तपासणी करण्यात आली. बाकीच्या लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 80 वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.खरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना होमक्कारंटाईन करण्यात आले आहे. या भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. स्थानिक करोना समिती व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

लहित येथील 29 वर्षीय तरुणाचे अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना अहवाल येण्यापूर्वीच निधन झाले आहे. सदर लहित येथील 29 वर्षीय तरुण हा पुणे, चाकण या भागात नेहमी ये-जा करत असल्याची माहिती आहे. त्याला काही दिवसांपूर्वी त्रास होत असल्याने तीन दिवसांपूर्वी अकोले ग्रामीण रूग्णालयाने संगमनेर येथे स्वॅब घेऊन उपचारासाठी पाठविले होते. त्याचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवले असता अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तालुक्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com