अकोले तालुक्यातील करोना रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली

करोना
करोना

अकोले/राजूर|प्रतिनिधी|Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. काल बुधवारी सकाळी आजपर्यंतची तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आढळली. काल 14 रुग्ण पॅाझिटिव्ह आल्याने तालुक्यात रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 110 झाली आहे.

तालुक्यात हळूहळू रुग्णसंख्या वाढत असताना काल बुधवारी सकाळी तब्बल 14 रुग्णांचे अहवाल पॅाझिटिव्ह आलेत. यामध्ये माणिक ओझर या गावातीलच 10 रुग्ण आहेत . एकाच दिवशी एवढ्या रुग्णांचा अहवाल पॅाझिटिव्ह येण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील माणिक ओझर हे करोनाचे हॅाटस्पॅाट ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

माणिक ओझर येथे पहिले 11 व आजचे 10 असे एकूण 21 रुग्ण करोना बाधित झाले आहेत.अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे. यामध्ये कुटुंबातील, नातेसंबंधातीलच रुग्ण असून लहान मुलेही बाधित आढळून आली आहेत. प्रशासनाने माणिक ओझर गावच्या सिमा पॅक करून गाव बंद ठेवण्यात आले आहे. याबरोबर सकाळी राजूरला दोन, वाघापूर एक व निंब्रळ एक अशी चार व माणिक ओझर मिळून एकूण 14 रुग्ण बाधित आढळले आहेत.

अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील सकाळी आलेल्या अहवालात तालुक्यातील माणिक ओझर येथील 42, 34, 33, 32 वर्षीय पुरुष 60, 48,37 वर्षीय महिला व 14, 5,1 वर्षीय लहान मुलांसह 10 जण तर राजूर येथील 60 व 30 वर्षीय पुरुष, वाघापूर येथील 45 वर्षीय पुरुष व तालुक्यात पुन्हा नविन गाव निंब्रळ येथील 21 वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे.

राजूर येथील बाधित हे ठाणे मुंबई येथे राहत असून ते काही दिवसांपूर्वी राजूरला आले असल्याची माहिती आहे. ते ज्यांचेकडे आले त्या कुटुंबांतही पूर्वी पॅाझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तर निंब्रळ येथील बाधित तरुण हा निळवंडे शिवारातील आहे व तो पिंपरी चिंचवड पुणे येथून आलेला असल्याची माहिती आहे.

काल दुपारपर्यंत तालुक्यात रुग्णांची एकूण संंख्या 110 झाली आहे. त्यापैकी 66 जण करोनामुक्त झाले. 3 मयत तर 41 जणांवर उपचार सुरू आहेत.खानापूर कोव्हिड सेेंटर येथून 56 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

रॅपिड टेस्ट खानापूर कोव्हिड सेंटर येथे सुरू

अकोले तालुक्यातील कोव्हिड सेंटर असलेल्या खानापूर येथे काही दिवसांपासून करोना तपासणीसाठी संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपाणीसाठी जात आहे. प्रशासनाने यातही गतिमानता आणत तालुक्यातच या कोव्हिड सेंटरमध्ये रॅपिड टेस्ट (तात्काळ अहवाल सांगणारी) करण्यास सुरुवात केली. काल 4 जणांची टेस्ट घेण्यात आली या सर्वाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com