‘अविष्यत’कडून पावणे पाच लाखांच्या औषधांची मदत

‘अविष्यत’कडून पावणे पाच लाखांच्या औषधांची मदत

अकोले |प्रतिनिधी| Akole

ठाणे येथील अविष्यत ट्रस्ट या संस्थेने अकोले तालुक्यातील करोना रुग्णांसाठी पावणे पाच लाख रुपयांची औषधे पाठवली आहेत. या औषधांचे विविध करोना केंद्रांसाठी वितरण करण्यात आले. सुगाव येथील 50 ऑक्सिजन बेडची सुविधा असणार्‍या करोना केंद्रालाही या संस्थेने यापूर्वी एक लाख रुपयांची मदत केली आहे.

अकोले तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या सहकार्याने सुरू केलेल्या सुगाव कोव्हिड सेन्टरला अविष्यतने 1 लाख रुपयांचा निधी अगोदरच दिला होता. त्यांनी पाठवलेल्या 4 लाख 72 हजार इतक्या रकमेच्या औषधांचे वितरणही शिक्षक व आरोग्यसेवकांच्या माध्यमातून तालुकाभरच्या कोव्हिड सेंटरला करण्यात आले. येथील अगस्ति विद्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी, अगस्ति विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभंग यांच्याहस्ते या औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील धुमाळ, घनश्याम माने, प्रकाश आरोटे, शिवाजी देशमुख, राजीव देशमुख, भाऊसाहेब चासकर, धनंजय भांगरे, प्रकाश सुर्वे, विलास गोसावी, भीमाशंकर तोरमल, विजय उगले, गणेश आवारी आदी शिक्षक व निवडक आरोग्यसेवक हजर होते.

या औषधांचं वितरण तालुकभरातील अगस्ती मंदिर, सुगाव खुर्द, समशेरपूर, कळस कोतूळ, ब्राह्मणवाडा, धामणगाव, धुमाळवाडी, इंदोरी, राजूर, गणोरे येथील सरकारी व स्वयंसेवी संस्थानी सुरू केलेल्या कोव्हिड सेंटर्ससाठी करण्यात आले. या औषधांमुळे आम्हाला समाजासाठी काम करण्यास अधिक ऊर्जा मिळेल असं मत या वेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी, सागर वाकचौरे व संदीप दराडे यांनी व्यक्त केले. तर सुनिल धुमाळ यांनी अविष्यतचे आभार मानताना ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद बागुल व अविष्यतची टीम ही अकोलेकरांसाठी देवदूत असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याशी संपर्क करून देणार्‍या प्रकाश सुर्वे व गणेश साळवे यांचे आभार मानले.

कोव्हिड बरोबरच युद्ध ऐन ऐरणीवर आलेलं असताना ठाण्यातील अविष्यत नावाची संस्था अकोलेकरांच्या मदतीला धावून आली आहे. अकोल्यात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने शिक्षक समन्वय समितीने संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बागुल व अविष्यत ची टीम यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार संस्थेने पावणे पाच लाख रुपयांची औषधे तातडीने पाठवली. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार शक्य होणार आहे. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी या औषधांची मोठी मदत होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com