अकोलेतील करोना रुग्णांच्या मदतीला धावल्या अनेक संस्था

अकोलेतील करोना रुग्णांच्या मदतीला धावल्या अनेक संस्था

अकोले |प्रतिनिधी| Akole

करोनाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील करोना रुग्णांच्या मदतीसाठी अनेक संस्था सामाजिक जाणिवेतून पुढे आल्या आहेत.

आता अकोलेमध्ये डॉ.भांडकोळी यांच्या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या शासकीय कोव्हिड हॉस्पिटलसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अमृतसागर दूध संघाने 25 करोना रुग्णांसाठी दोन वेळेस जेवणाची सोय, दोन वेळेस चहा व एकवेळ नास्ता याची सोय करून महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे.

अगस्ति सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजीमंत्री मधुकरराव पिचड, उपाध्यक्ष सीताराम पा.गायकर व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने अगस्ति सह. साखर कारखान्याच्यावतीने विठ्ठल लॉन्स येथे कोव्हीड सेंटर सुरू करून तेथे 100 करोना रुग्णांसाठी 100 बेड्स, त्यांच्यासाठी दोन वेळेचे जेवण, दोन वेळेस चहा व एकवेळ नास्ता, पिण्याच्या पाण्याची सुविधा करून पहिले पाऊल टाकले. त्यानंतर डॉ.मारुती भांडकोळी व डॉ. ज्योती भांडकोळी यांनी स्वतःच्या मालकीच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 25 बेड्सची सुविधा मोफत करून दिली आहे.

चेअरमन अ‍ॅड. मंगला हांडे यांच्या महिला पतसंस्थेने शासकीय कोव्हिड हॉस्पिटलसाठी टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅकसह फर्निचर भेट म्हणून देण्यात आले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पा. गायकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी करोना रुग्णांची जीवावर उदार होऊन सेवा करणार्‍या आशा सेविका व गट प्रवर्तक यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रत्येकी 1000 रुपये,दोन मास्क,1 लिटर सॅनिटायझर अशी चार लाखांची आर्थिक मदत करण्यात आली.

सीताराम पा. गायकर व अगस्ति पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर यांच्या पुढाकाराने अगस्ति पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांनी आर्थिक मदत केली तर जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांनी भरीव आर्थिक मदत केली. या कामी सीताराम पा.गायकर, डॉ. अजित नवले, विनय सावंत, बाळासाहेब भोर, महेश नवले यांनी पुढाकार घेतला.

रोटरी क्लब अकोले यांच्या माध्यमातून शासकीय कोव्हिड हॉस्पिटलसाठी फ्रीज, ऑटो हॅन्ड सॅनिटायझर स्टँड, स्टेथॅस्कोप, थर्मल गण, नेब्युलायझर मशीन, बी.पी.एपरेटर्स इत्यादी आरोग्य साहित्य पुरविण्यात आले. अजून काही सामाजिक संघटना, संस्था यांनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com