अकोले तालुक्यात करोनाचा दुसरा बळी
सार्वमत

अकोले तालुक्यात करोनाचा दुसरा बळी

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोले तालुक्यात करोनाचा दुसरा बळी गेला आहे. काल लहित येथील 29 वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान अहमदनगर येथे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब तपासणीचा अहवाल आज पॅाझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील करोनाचा हा दुसरा बळी आहे.

लहित येथील हा तरुण चाकण येथे नोकरीस असल्याचे समजते. त्रास होऊ लागल्यामुळे त्याने प्रथम गावात उपचार घेतले. नंतर त्याला संगमनेर येथे दाखल करण्यात आले. तपासणीसाठी दोन दिवसां पूर्वी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान त्याची तब्येत जास्तच बिघडल्यामुळे त्याला नगर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला,त्याच्या स्वॅब तपासणीचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल आज प्राप्त झाला, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

काल बुधवारी एकाच दिवशी सात रुग्ण सापडले होते. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांनी अर्धशतक गाठले आहे. त्यातील 38 रुग्ण बरे झाले असून 10 जणांवर उपचार सुरू आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. देवठाण वार्ताहराने कळविलेल्या माहिती नुसार देवठाण येथे मागील आठवड्यात करोनाबाधित महिला आढळून आली होती. तिच्या संपर्कात आलेली ऐंशी वर्षांची वृद्ध महिलेचा काल पॉझिटिव्ह अहवाल आल्याने या परिसरातील संपूर्ण रस्ते बंद केले आहेत.

गावात एक विवाह होणार होता त्या लग्नाच्या निमित्ताने पाहुणे आले होते या लोकांची तपासणी करण्यात आली तर ऐंशी वर्षाच्या महिलेचा कालच अहवाल पॉझिटिव्ह आला तर आज आणखी एक तिसर्‍या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून या भागाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान देवठाण येथील सोळा करोना संशयित म्हणून तपासणीसाठी पाठवले होते, त्यातील चौदा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक जण करोना मुक्त झालेला आहे. पॉझिटिव्ह दोन जणांवर उपचार चालू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com