अकोले शहर व प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद

अकोले शहर व प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद

अकोले |प्रतिनिधी| Akole

हिंदू समाजावर होणारे वारंवार हल्ले व जोर्वे घटनेच्या निषेधार्थ अकोले शहर काल कडकडीत बंद ठेवण्यात आले. तालुक्यातील राजूर, कोतुळ, समशेरपूर, देवठाण, वीरगाव, कळस या प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते संगमनेर येथील विराट मोर्चात सहभागी झाले होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना काल अकोले बंद चे निवेदन दिले होते. त्यानुसार शहरासह तालुक्यातील प्रमुख बाजार पेठा असणार्‍या गावांत छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध भागांतून समोर आलेल्या हिंदू अत्याचारासह लव्ह जिहादच्या घटना, केरला स्टोरी या चित्रपटातून समोर आलेले त्याचे भयानक वास्तव, दिल्लीतील सोळावर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीचा भररस्त्यात झालेला निर्घृण खून, मंचरमधील अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण आणि मागील रविवारी जोर्वेनाक्यावर आठ हिंदू तरुणांना मोठ्या सशस्त्र जमावाकडून झालेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कारणांनी हिंदू समाजात खद्खद्त असलेला रोष आज संगमनेरात भगवा मोर्चातून दिसून आला. या मोर्चाला अकोले शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांनी बंद पाळून आपला पाठिंबा दर्शविला. तर हजारो तरुण व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सकल मराठा समाजाचे नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यामुळे अकोले शहरासह ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठांत व्यवसाय बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला.

राजूर येथे सकाळी भरणार भाजीपाला बाजार बंद होता तर व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले दैंनदिन व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध केला यात सर्वपक्षीय कार्यकर्ते, हिंदू संघटना, सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद सारखे वाढणारे प्रकार, त्यातून होणार्‍या हिंदू मुलींच्या हत्या, खून, हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात व संगमनेर मधील जोर्वे नाक्यावर हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संगमनेर येथे भगवा वादळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या भगव्या वादळी मोर्चाला पाठींबा देण्यासाठी संगमनेर तालुक्याबरोबर अकोले तालुक्यातील नागरिकांनी बंद पाळला. त्यास अकोले, राजूर, कोतुळ, ब्राम्हणवाडा, देवठाण, गणोरे, कळस येथे व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक सेवा वगळता आपली दुकाने बंद ठेवली होती. व या मोर्चाला पाठींबा दिला. अकोले तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.अकोलेचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com