धक्कादायक! आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण

धक्कादायक घटनेनं नगर हादरलं
धक्कादायक! आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण

अकोले (प्रतिनिधी)

शिरपुंजे आश्रम शाळा येथील सात आदिवासी विद्यार्थ्यांना येथील वसतीगृह अधीक्षक अश्विन पाईकराव यांनी जळत्या लाकडाने बेदम मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थी अशोक संतु धादवड, युवराज भाऊ धादवड, बाबु संतु धादवड, दत्ता सोमनाथ धादवड, ओमकार भिमा बांबळे व गणेश लक्षमण भांगरे यांनी विस्तव पेटविल्याचे कारण देत अधीक्षक पाईकराव याने विद्यार्थ्यांना अंगावर वळ उमठेपर्यंत मारहाण केली आहे. वसतीगृह अधीक्षक पाईकराव यांनी केलेल्या या अमानुष कृत्याचा डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) या युवक संघटनेने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. हे कृत्य करणाऱ्या वसतीगृह अधीक्षकाला तातडीने निलंबित करण्याची मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन आमदार बी. के. देशमुख यांनी सभागृहात आश्रमशाळांची संकल्पना राज्यभर राबविण्याची जोरदार मागणी केली होती. परिणामी तत्कालीन सरकारला या संकल्पनेच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी बी. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी लागली होती. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्यभर आश्रमशाळा व आदिवासी विद्यार्थी वसतीगृहे सुरु करण्यात आली. स्थापन झालेल्या या आश्रमशाळांमधून हजारो, लाखो आदिवासी विद्यार्थी उच्च पदांपर्यंत पोहचले.

आश्रमशाळांचा पॅटर्न राज्यभर पोहचविणाऱ्या बी. के. देशमुखांच्या तालुक्यात मात्र आज आश्रमशाळांची दैना झाली आहे. भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळे या आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी यातनागृह बनल्या आहेत. शिक्षण सोडाच साधे नीट जेवण व निवासाची साधी व्यवस्थाही आश्रमशाळांमध्ये होत नाही असे भीषण वास्तव तालुक्यात निर्माण झाले आहे. भरीस भर अत्यंत उद्दाम अधिकाऱ्यांची या आश्रमशाळांमधून नियुक्ती झाल्याने विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये प्रवेश टाळू लागले आहेत. शिरपूंजे आश्रमशाळेत घडलेल्या अमानुष मारहाणीने हीच बाब अधोरेखित केली आहे.

प्रशासनाने सदरची बाब लक्षात घेता मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत अधीक्षक पाईकराव यांना निलंबित करावे. चौकशी अंती दोषी आढळल्यास या अधीक्षकास कायम स्वरूपी कामावरून काढून टाकावे. आश्रमशाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशा मागण्या डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष साथी एकनाथ मेंगाळ, सरचिटणीस साथी गोरख अगिवले, कार्यकारिणी सदस्य साथी वामन मधे, नाथा भहुरले, वाळीबा मेंगाळ, अजित भांगरे, सुरेश गि-हे यांनी केल्या आहेत.

शिरपुंजे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षकांनी जबर मारहाण केल्याने त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी स्थानिक व पालकांनी केली आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांची भेट घेऊन स्थानिक नागरिक व पालकांनी मारहाणीबाबत माहिती दिली. प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांचेकडे पालकांनी तक्रार दाखल केली असून भवारी यांनी संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com