अकोलेत सत्तारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न फसला

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
अकोलेत सत्तारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न फसला

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले शहरात महाविकास आघाडीच्यावतीने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या प्रतिकात्मक पोस्टरला महिलांनी जोडे मारले. यावेळी प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे कार्यकर्त्यांचा पुतळा दहन कार्यक्रम फसला.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे माध्यमांशी प्रतिक्रिया देत असताना संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या स्तराला जाऊन गलिच्छ शब्दप्रयोग केल्याने राज्यात अनेक ठिकाणी मंत्री सत्तारांचा निषेध केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अकोले शहरातील कोल्हार-घोटी राज्य मार्गावर अगस्ती विद्यालयासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख, सुधीर शेळके, विकास शेटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वसंतराव मनकर, पोपटराव दराडे, बाळासाहेब ताजणे, विनोद हांडे, बाळासाहेब भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकाडे, उपाध्यक्ष आर. के. उगले, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, सरचिटणीस विकास बंगाळ, उद्योजक सुरेश गडाख,, सौ. निता आवारी, युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, अनिल कोळपकर, भीमाशंकर कवडे, भागवत शेटे, संतोष नाईकवाडी, महेश तिकांडे, शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक अरिफ शेख यांचेसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. तर काँग्रेस व शिवसेनेच्या प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

यावेळी आ. लहामटे, उद्योजक सुरेश गडाख, सौ. निताताई आवारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा देत त्यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे. मंत्री सत्तार यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी गडाख यांनी केली आहे.सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com