अकोल्यात मोर्चा काढून शेतकरी विरोधी कायद्याची होळी

अकोल्यात मोर्चा काढून शेतकरी विरोधी कायद्याची होळी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

करण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याच्या आवाहनानुसार काल शुक्रवारी अकोल्यात मोर्चा काढून कायद्याच्या प्रती जाळत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

अखिल भारतीय किसान सभा (मा.क.प.) अखिल भारतीय किसान सभा (भा. क.प.) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमान आदी संघटनांनी अकोलेत शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केले.

वसंत मार्केट समोरील परिसरात केंद्राच्या कृषी कायद्यांच्या प्रतिची होळी करण्यात आली. मानवी साखळी करत केंद्र सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. शहरातून मोर्चा काढत यावेळी शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले.

यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, कॉ. कारभारी उगले, डॉ.अजित नवले, विनय सावंत, कॉ. शांताराम वाळुंज, मच्छिंद्र धुमाळ, आनंदराव नवले, महेशराव नवले, चंद्रकांत नेहे, कॉ. सदाशिव साबळे, कॉ. नामदेव भांगरे, हेरंब कुलकर्णी, संपतराव नाईकवाडी, विनोद हांडे, कॉ. लक्ष्मण नवले, कॉ. विलास नवले, सुरेश नवले, कॉ. ज्ञानेश्वर काकड, कॉ. गणेश ताजणे आदींची यावेळी भाषणे झाली.

केंद्र सरकारच्या कायद्या संदर्भात सरकारची भाषा शेतकर्‍यांना मुक्त करण्याची करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यां ऐवजी सरकार आपल्या जबाबदार्‍यांपासून मुक्त होत आहे. कृषी कायद्यांच्या आडून बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचे, हमी भावाचे संरक्षण नष्ट करण्याचे व कॉर्पोरेट कंपन्या व निर्यातदारांना शेती व शेतकर्‍यांची लूट करण्याची खुली सूट देण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या या धोरणांचा आज देशभर विरोध होत आहे. अकोल्यात आज सर्व शेतकरी हितैशी संघटना एकत्र आल्या आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.यावेळी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, रामहारी तिकांडे, रवींद्र मालुंजकर, बबन वाळुंज, मच्छिंद्र मंडलिक आदींसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारचा निषेध करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com