अकोलेत राजकीय वातावरण पुन्हा तापणार! 'या' तारखेला होणार अगस्ती कारखान्याची निवडणूक

अगस्ती कारखाना
अगस्ती कारखाना

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति कारखान्याची स्थगित झालेली निवडणूक आता 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज तसा निर्णय दिला.

अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 17 जुलै रोजी होणार होती मात्र 15 जुलै रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकीला 30 सप्टेंबर पर्यंत स्थगिती दिली, त्यामुळे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असतांना अगस्ति कारखान्याची निवडणूक स्थगित झाली.

माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि आमदार डॉ किरण लहामटे, कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोकराव भांगरे, काँग्रेसचे नेते मधुकरराव नवले, माकपचे नेते डॉ. अजित नवले, भाकपचे नेते कारभारी उगले यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळ यामध्ये चुरशीची सरळ लढत होती. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीने उमेदवार परबत नाईकवाडी व विकास शेटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या निर्णयाला आव्हान दिले होते. तसेच कारखान्याचे सभासद दिलीप मंडलिक यांनीही याचिका दाखल केली होती.

या दोन्हीही निकालांवर आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे व अर्जुन पेडणेकर यांचे समोर सुनावणी झाली. शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीने ॲड. रमेश धोर्डे तर सभासदांच्या वतीने ॲड. अजित काळे व ॲड. अनिकेत चौधरी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे व निवडणूक प्राधिकरनाच्या वतीने दिघे यांनी बाजू मांडली.

जर अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूका याच काळात होणार असतील तर अगस्ति सहकारी साखर कारखाना निवडणूकीला स्थगिती का? असा युक्तिवाद शेतकरी समृद्धी मंडळाच्या वकिलांनी मांडला तर त्यावर सरकारने 15 जुलै रोजी दिलेले आदेश हे संपूर्ण महाराष्ट्राकरिता होते, सदर आदेश काढतांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांचा अहवाल विचारात घेण्यात आला असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व गोष्टी सामोर आल्यानंतर न्यायालयाने अकोले तालुका हा पूरग्रस्त परिस्थितीमध्ये येत नाही.

त्यामुळे 15 जुलैचा आदेश हा अकोले तालुक्यासाठी लागू होत नाही असे सांगितले. तसेच अगस्ति कारखान्याची स्थगित झालेल्या निवडणूकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचा आदेश दिला आहे. तर 26 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या दीड महिण्यांपासून शांत असणारे अकोले तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा आरोप-प्रत्यारोपाने ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com