आढळा धरण भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आढळा धरण भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वीरगाव (वार्ताहर)

अकोलेसहित संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 16 गावांतील 3914 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणारा देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्प आज शुक्रवारी पहाटे 3.30 वा. पुर्ण क्षमतेने भरला.

आढळा नदीवरील पाडोशी आणि सांगवी हे दोन्ही लघुप्रकल्प भरल्यानंतर नदीपात्रात सातत्याने सुरु असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने आज देवठाणच्या आढळा धरणाला पुर्णत्व प्राप्त झाले.1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा हा प्रकल्प पुर्णत्वाने भरल्यानंतर सांडव्यावरुन 150 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला.

आढळेच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसूच्या पूर्वार्धात सुरु झालेली पावसाची संततधार उत्तरार्धापर्यंत टिकून राहिल्याने नदीप्रवाह अखंड वाहताच राहिला.लाभक्षेत्राला कायम दिर्घप्रतिक्षा करायला लावणारे हे धरण 15 जुलैला पुर्णत्वाने भरल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पाणलोट क्षेत्रातून संततधारेमुळे धरणात पाणीआवक होत असल्याने सांडव्यावरील विसर्ग वाढणार आहे.आढळा नदीकिनारी असणा-या सर्वांनीच सतर्कता बाळगावी असे आवाहन जलसंपदाचे सहाय्यक अभियंता आर.बी.कवडे आणि कालवा निरीक्षक मयुर देशमुख यांनी केले आहे.

पुर्वीच्या शिल्लक 415 दलघफू पाण्यात नव्याने 645 दलघफू पाण्याची आवक झाल्याने 1060 दलघफू पाणीसाठा पुर्ण झाला.आनंदी झालेल्या अनेक शेतक-यांनी आढळा धरणातील पाण्याचे साडीचोळी आणि पुष्पांजलीने पूजन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com