
अकोले | प्रतिनिधी
अगस्ति कारखान्यासाठी (Agasti Sugar Factory) ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरचा अपघात (Tractor accident) होऊन ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
आज गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अकोले (Akole) तालुक्यातील राजूर जवळील कातळापूर शिवारात घटना घडली. रामेश्वर साईदास राठोड (वय 21) रा.पिशोर कोळंबी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद असे या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
ऊसतोड कंत्राटदार शिवनारायण मगन राठोड (रा.कन्नड) यांचे कडे रामेश्वर राठोड हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. अगस्ति कारखाण्यावर ऊस खाली करून तो परत चालला होता. चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पडत असतांना या हंगामातील हा पहिलाच गंभीर अपघात आहे.
अपघाताची माहिती मिळताच कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर, शेतकी अधिकारी सतीश देशमुख व सर्व शेती खात्यातील कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा राजूर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.