संगमनेरात दाणादाण, वादळी पावसाचे चार बळी
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरासह तालुक्यात सर्वदूर वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी 3.30 वाजता वादळी वारे सुरू झाले. या वादळी वार्याने अनेक झाडे, विजेचे पोल उन्मळून पडले. शेतकर्यांच्या जनावरांच्या गोठ्यांची पत्रे उडाली तर काही ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या झाडांमुळे वाहतूक ठप्प झाली होती. अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारात तारामळी वस्ती येथे वादळी वार्यामुळे घर पडून तीघे जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच मालदाड येथेही वादळी वार्यासह पाऊस झाला. मालदाड शिवारातील ढमाळदरा परिसरात वादळी वार्यामुळे लिंबाचे झाड अंगावर पडून सुरेखा राजू मधे (वय 28, रा. नळवाडी, ता. सिन्नर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
संगमनेरात शासकीय विश्रामगृहाच्या गेटवर मोठे झाड पडल्याने गेटचे नुकसान झाले. या वादळी वार्यासह पावसाने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवार, बुधवार आणि काल गुरुवारी वादळी वार्यासह पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. धांदरफळ, निमज, राजापूर, वेल्हाळे, गुंजाळवाडी, घुलेवाडी, जोर्वे, पिंपरणे, रहिमपूर, कोकणगाव, निमगावजाळी, वडगावपान, मेंढवण, औरंगपूर, चिंचपूर या परिसरात वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक वृक्ष उन्मळून पडले आहे. तर काही ठिकाणी विजेचे पोल पडले. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच खांडगाव, झोळे, वाघापूर व रायते शिवारातही वादळी वारे झाले. या वार्यामुळे विजेची मुख्य वाहिनीचे पोल पडल्याने तेथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. राजापूर शिवारात वादळी वार्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही विजेच्या पोलच्या तारा तुटल्या. नूतन विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे पत्रेही उचकटले.
संगमनेर शहरात दुपारी 3.30 वाजता जोरदार वादळी वारे सुरु झाले. अर्धातास वादळी वारे सुरु होते. यामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे लिंबाचे झाड उन्मळून पडल्याने गेटचे नुकसान झाले. रिक्षा स्टॉपजवळही मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गोल्डन सिटी, अकोले बायपास, 132 केव्ही, ऑरेंज कॉर्नर येथेही झाडे पडली. वादळी वार्यासह पावसाने सुरुवात केली. मध्येच गाराही पडल्या. शहरात काही क्षणात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे शहरातील गटारीही उन्मळून वाहत होत्या. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. विज वितरण कंपनीच्या कार्यालय परिसरातही झाड पडले. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत. मालदाड रोडलगत असलेली छोटी मोठी झाडे उन्मळून पडली. तर या परिसरात बाजार असल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. विश्रामगृहाजवळ पडलेले झाड सार्वजनिक बांधकाम विभाग व संगमनेर नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने बाजूला केले. बस स्थानकाजवळील विजेचा पोल पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला.
घुलेवाडी शिवारात वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसासह गारपीट या परिसरामध्ये झाली. वादळी वार्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे झाडांखाली लावलेल्या मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकर्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तर मंदिराचे पत्र्याचे शेड उडून गेले.
वादळी वार्यासह झालेल्या पावसाने संगमनेर परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. यामध्ये फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कैर्यांचा खच पाहायला मिळाला आहे.
गुंजाळवाडी शिवारात वादळी वार्यामुळे सुमारे 20 ते 25 घरांवरील पत्रे उडून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. डाळींब, कांदा पिकांचेही नुकसान झाले आहे. मारुती आनंदा गुंजाळ, नामदेव आनंदा गुंजाळ, सुर्यभान मारुती गुंजाळ, बबन दगडू गुंजाळ, प्रकाश बाळासाहेब गुंजाळ, संतोष किसन गुंजाळ, नंदू यशवंत गुंजाळ, गेणू लहानु जगताप, पंढरीनाथ गबाजी गुंजाळ, बाबुराव केशव गुंजाळ, पांडुरंग रंगनाथ गुंजाळ, भानुदास सहादु गुंजाळ, भाऊ सुदाम जगताप, रावसाहेब लक्ष्मण गुंजाळ, बाजीराव भागुजी गुंजाळ, राजेंद्र सदाशिव गुंजाळ, दत्तात्रय आनंदा गुंजाळ, भाऊ शिवराम जगताप, राजेंद्र सदाशिव गुंजाळ, संगिता भिमराज पवार, शेळके या शेतकर्यांचे घरावरील पत्रे उडून गेले आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पोमल तोरणे यांनी गुंजाळवाडी शिवारातील नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे सुरु केले आहेत. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, गुंजाळवाडीचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, सदस्य राजेंद्र गुंजाळ, नामदेव गुंजाळ, ग्रामपंचायत कर्मचारी रजनीकांत राहाणे, अरुण गुंजाळ हे उपस्थित होते.
नुकसान ग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सिताराम पानसरे यांनी केली आहे.

घारगाव |वार्ताहर| Ghargav
संगमनेर तालुक्याला सलग दुसर्या दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वार्यात पठार भागातील मुंजेवाडी (अकलापूर) येथे गुरुवारी (दि.9) दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घराची भिंत पडून आदिवासी कुटुंबातील दोन वृद्ध भावाबहिणीचा तर एका 10 वर्षीय नातवाचा मृत्यू झाला आहे. इतर दोनजण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. गुरुवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी वार्यासह पावसाने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडाले. भिंती अंगावर पडल्याने घरात असलेले विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय 75) त्यांची बहिण हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय 67), नातू साहील सुभाष दुधवडे (वय 10) यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय 70), नात वनिता सुभाष दुधवडे ( वय 8) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी प्रशासनाशी संपर्क करत पुढील सूचना दिल्या. महसूलचे मंडल अधिकारी इराप्पा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, प्रशांत आभाळे यांसह काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, मनसेचे किशोर डोके, माजी सरपंच विकास शेळके, पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ, संतोष देवकर, संपत आभाळे यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत झालेल्यांना संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने पठार भागात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यात 116 घरांची पडझड
संगमनेर तालुक्यात वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या घराची माहिती मंडलनिहाय- साकूर 13, संगमनेर 35, धांदरफळ 7, समनापूर 10, तळेगाव 1, पिंपरणे 49, घारगाव 1, अशी एकूण 116 घरांची पडझड झाली आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.