मुंबई (प्रतिनिधी) -
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्हयात पक्षाला चांगली साथ मिळावी. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्हयाने

साथ दिली. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नगर जिल्ह्यातील नेत्यांना दिला. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतातच, असेही पवार यांनी सांगितले.

आज नगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील सीताराम गायकर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते. विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचं काय? भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही, असेही पवार यांनी सांगितले.

घटना घडत असतात. कोण जात असते कोण येत असते. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून आम्हाला संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्षपद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

वेगवेगळ्या प्रकारे मागण्या पूर्ण करण्याचे काम राष्ट्रवादीमय जिल्हा होता म्हणून काम केले.
वैभव पिचड यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काय झाले माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात काटयाने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार मिळाला , असे अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हा बँक प्रकरणात सज्जड दम
नगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली. कशी आणि कुणी केली हे मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊदे नंतर बघतो एकेकाला, असा सज्जड दम अजित पवार यांनी यावेळी भरला.

आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय : जयंत पाटील
आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करत आहोत, असे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले.
शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिले. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी गायकर यांना उद्देशून करताच एकच हशा पिकला. कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते, याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.