
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. मात्र कसब्यात 28 वर्षांपासून असलेला भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला त्यामुळे कसब्याची निवडणूक तर अशी झोंबलीय. असा टोला विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपाला लगावला. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनाही कानपिचक्या दिल्या.
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदानावर महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या संवाद यात्रेचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. जनतेच्या मनात येईल तेव्हा जनता बदल करते. शिक्षक-पदवीधरांनी केलेला बदल महाराष्ट्राने पाहिला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी-नेतेमंडळींनाही कानपिचक्या दिल्या. भांड्याला भांडं लागतं, घरातही लागतं.पण त्याचा आवाज किती निघू द्यायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
कसब्यातल्या विजयानं आपण हुरळून जायचं कारण नाही.जमिनीवर पाय ठेवूनच लोकांमध्ये काम करत राहायचं असं अजित पवार म्हणाले. महाविकासआघाडी म्हणून सगळ्यांनी मानसिकता तयार केली पाहिजे. आपण उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्या पद्धतीने जागा लढवायच्या.अंतर्गत वाद घालून खेळ खंडोबा करू नका. हे सरकार पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लावत नाहीत.निवडून येऊ की नाही याचा अंदाज त्यांना येत नाही त्यामुळे निवडणुका पुढे ढकलतायत असा दावाही पवार यावेळी केला.
व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार निलेश लंके, माजी आ.नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, पाडुरंग अभंग, कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, राष्ट्रवादीचे घन:शाम शेलार ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शुभांगी पाटील, शशिकांत गाडे, प्रशांत गायकवाड, दिलीप लांडे, कपिल पवार शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, दिलीप लांडे, योगिता राजळे, गहिनीनाथ शिरसाट, बंडू बोरुडे, चाँद मणियार, वैभव दहिफळे, देवा पवार,भाउसाहेब धस यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. प्रताप ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी मानले.
कार्यक्रमास माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार हे अनुउपस्थित होते.तसेच सुमारे दोन तास सुरु असलेल्या सभेत उपस्थितांमध्ये कुठलाही उत्साह किंवा जोश दिसुन आला नाही.