राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

नगरविकास उर्जा राज्यमंत्र्यांसह तब्बल सहा खाती तुम्हाला दिली आहेत. वाढपी तुमचाच आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी नाही, असे आश्वासन देत

निळवंडे कालव्यांसह राहुरी बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, आरडगाव, बाभुळगाव, गणेगाव, खडांबे व पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील मुख्यमंत्री सौरऊर्जा अंतर्गत कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील प्रांगणात बोलत होते. यावेळी ना. पवार यांच्या हस्ते विविध कामांचे कळ दाबून भूमिपूजन करण्यात आले. व्यासपीठावर माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमिलाताई कोळसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ना. पवार म्हणाले, करोनामुळे विकासदर घटला, पैशाची कमतरता आहे. परंतु उपलब्धतेनुसार वचनपूर्ती करणारच, असे आश्वासन देवून येणार्या महसुलातून बारा हजार कोटी महिन्याला पेन्शन व पगारावर खर्च होतात. अतिवृष्टीला दहा हजार कोटी दिले. कोकणात मदत दिली, केंद्र पाहिजे तेवढी मदत देत नाही. केंद्राकडे आजही पंचवीस हजार कोटी रुपये येणे आहे. परंतु पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शेतकरी केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारचे काम समन्वयाने सुरू आहे. महावितरण शेतकर्यांना वीजबिलात दंडव्याज माफी 50 टक्के सवलत देत आहे.

याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकर्यांनी वीजबिले भरावी. त्याचाही फायदा आपल्याच भागातील विकासकामांसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात पर्यावरण रक्षण व हरित महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपले आजोळ राहुरी तालुका असल्याने या तालुक्यावर माझे विशेष प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री प्राजक्त तनपुरेंना विकास कामासाठी भक्कम पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, गेल्या दहावर्षात शेतकरी व शेतीच्या प्रश्नांबाबत तालुक्यात विदारक चित्र दिसले. पाणी असूनही लोडशेडिंगमुळे शेतीची अवस्था बिकट झालेली होती. मुख्यमंत्री सौरकृषीवाहिनी योजनेची मुहूर्तमेढ राहुरी तालुक्यात रोवली असून वांबोरी, बाभुळगाव, गणेगाव, आरडगाव, पाथर्डीतील शिरापूर मिळून जवळपास साडेआठ हजार शेतकर्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी एकोणीस मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती येणार्या सहा महिन्यात होऊ घातलेल्या प्रकल्पातून होणार आहे.

वीजबिल माफीचा आपल्या परिसराच्या विकास कामासाठी शेतकर्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कानडगाव, जांभळी, खडांबे येथे नवीन सबस्टेशनची मंजुरी आहे. त्याचप्रमाणे जेऊर व मिरी सबस्टेशनही प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. येणार्या चारवर्षात मतदारसंघातील एकही डीपी ओव्हरलोड राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राहुरी शहराची पाणी योजना विशेष म्हणून मंजूर केल्याबद्दल ना. पवारांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच निळवंडे कालवे, बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय व इतर विकासकामांसाठी ना. पवार यांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी तर आभार माजी उपसभापती रवींद्र आढाव यांनी मानले. कार्यक्रमास नगराध्यक्षा अनिता पोपळघट, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, बाळासाहेब लटके, धीरज पानसंबळ, संतोष आघाव, संजय साळवे, बाळासाहेब उंडे, शब्बीर देशमुख, विलास शिरसाट, इस्माईल सय्यद, दिलीप चौधरी, अॅड. राहुल शेटे, नंदकुमार तनपुरे, सागर तनपुरे, दत्ता कवाणे, राजेंद्र कोठारी, प्रशांत गायकवाड, आहेर, नंदाताई उंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, सत्यवान पवार, शिवाजी डौले, शिवाजी सागर, अनिल कासार, अरुण ठोकळे, दीपक तनपुरे, रावसाहेब शंकर तनपुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कातोरे, विलास तरवडे, अनिल डावखर, ताराचंद तनपुरे, महेश उदावंत सर्व नगरसेवक, सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्हाला मामा बनवतील

उपमुख्यमंत्री अजित पवार कानपिचक्या देत हास्यविनोदाच्या मुडमध्ये दिसून आले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर त्यांनी मिश्किल भाष्य केलं. ‘कामांसाठी मामांकडे पाठपुरावा करा, अन्यथा तुम्हाला मामा बनवतील’, असे त्यांनी म्हणताच हास्याचे कारंजे उडाले. काही लोक पवार साहेबांना सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली? सोडून गेलेले पडले, असं म्हणत त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड व वैभव पिचड यांंनाही चिमटे घेतले.