अहमदनगर (प्रतिनिधी)

सुरूवातीपासून करोना संसर्गाबाबत काळजी घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनही करोनाबाबत दक्ष आहेत. तसेच इतरांनी करोनाविरोधात दक्षत राहवे, असा पवार यांचा आग्रह आहे.

वांबोरी (ता. राहुरी) येथे आयोजित कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून अजितदादा चांगलेच संतापले. हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का, असा आपल्या खास शैलीत त्यांनी राग व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पवार आज जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.

पवार म्हणाले, करोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले. अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे 25 हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे. उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे 12 हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी करोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. करोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण करोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.