NCP Crisis : आ.किरण लहामटेंचं काही ठरेना! काल अजितदादांना समर्थन तर आज म्हणाले, “मी जनतेबरोबर”

गायकर गट अजित दादांच्या सत्कारासाठी मुंबईत
NCP Crisis : आ.किरण लहामटेंचं काही ठरेना! काल अजितदादांना समर्थन तर आज म्हणाले, “मी जनतेबरोबर”

अकोले | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४६ आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करत त्यांना अपात्र करावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रात्री एक वाजता थेट विधानसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दिली आहे. या नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशातच काल अजित पवार यांना पाठिंबा देणारे आमदार डॉ किरण लहामटे यांनी "मी जनतेबरोबर" असे सांगत आपल्या भूमिकेबद्दल ची संदिग्धता कायम ठेवली आहे. आ.डॉ. किरण लहामटे यांनी आज पिंपळगाव खांड धरणाच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना आपण जनतेबरोबर असे सांगत संभ्रमावस्था वाढविली आहे. तालुक्याला आनंदाची बातमी समजणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना तालुक्यातील विकास कामांना निधी मिळावा याच्या इतका दुसरा कोणताही आनंद नाही असे म्हणत दुसरीकडे 'तालुक्यातील जनता जिकडे तिकडे मी' अशी संभ्रमावस्थेची भूमिका आ.डॉ. किरण लहामटे यांनी सद्यस्थितीत घेतल्याचे दिसत आहे. काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना अकोलेचे आ.डॉ. लहामटे हे पहिल्या रांगेत उपस्थित होते, त्यामुळे ते अजित दादांच्या सोबत असल्याचे तालुक्यातील जनतेने पाहिले होते. आज मात्र त्यांच्या भूमिकेत काहीसा बदल झाल्याचे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसून येत होते.

NCP Crisis : आ.किरण लहामटेंचं काही ठरेना! काल अजितदादांना समर्थन तर आज म्हणाले, “मी जनतेबरोबर”
“आता आवाज माझ्या एकट्याचाच, चुकीच्या प्रवृत्तींना...”; शरद पवारांनी रणशिंग फुंकलं

दरम्यान अजित दादा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक व अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अगस्ति कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश मालुंजकर, माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती परबतराव नाईकवाडी, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, अगस्ति कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख, माजी संचालक बाळासाहेब ताजने, अकोले नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, शिवसेनेचे नगरसेवक नवनाथ शेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम वाकचौरे, युवा कार्यकर्ते निलेश गायकर, सतेज गायकर, संदेश गायकर, शुभम देशमुख आदी कार्यकर्त्यांनी 'देवगिरी' वर जाऊन अजित दादा पवार यांचा सत्कार केला आहे.

आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र काही आमदार बाहेरगावी असल्यामुळे ही बैठक रद्द झाल्याचे समजते. त्यामुळे आ.डॉ. लहामटे हे मतदार संघातील कार्यक्रमांत उपस्थित होते. येत्या ५ जुलै रोजी अजित दादांनी मुबंई येथे समर्थक आमदार, प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे, त्यावेळी आ.डॉ. लहामटे उपस्थित राहतात की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर व कैलासराव वाकचौरे यांना अजित दादा यांनी निमंत्रण दिल्याचे समजते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com