मुहूर्ताची खरेदीडाऊन

बुकिंग करूनही ग्राहक फिरकेना । शोरूम मालक हवालदिल
मुहूर्ताची खरेदीडाऊन

अहमदनगर (प्रतिनिधी) - पाडव्याच्या मुहूर्ताला कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे अ‍ॅटोमोबाईल सेक्टर आज पूर्णत: कोलमडले आहे. मुहूर्ताच्या खरेदीसाठी हौशी ग्राहकांनी कारचे बुकिंग केले, पण लॉकडाऊन लागण्याच्या भितीने त्यांनी डिलेव्हरी घेण्याला नकार दिलाय. मुहूर्ताची खरेदी डाऊन झाल्याने शोरूम चालक हवालदिल झाले आहेत.

नगर शहरात नामांकित कंपन्यांच्या कार विक्रीचे शोरूम्स आहेत. गतवर्षीही पाड्याव्याच्या पूर्वसंध्येला देश लॉकडाऊन झाला होता. दहा महिन्याच्या कालखंडानंतर आर्थिक घडी पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले. कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या व्यावसायिकांसह जिल्हा प्रशासन, शासनाची डोकेदुखी ठरू पाहते आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसांत राज्य लॉकडाऊन होईल असे संकेत मिळत आहे. लॉकडाऊन काळात नवीकोरी कार घेऊन करणार काय? आर्थिकगाडा पुन्हा रुळावरून घसरला तर काय? अशा प्रश्नांनी सतावलेले ग्राहक बुकींग करूनही नवी कार घेण्याला नकार देत आहेत. त्यामुळे शोरूम चालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

  • सोन्याची उलाढालही ठप्प

  • नवीन वाहनासोबतच मुहूर्तावर सोने खरेदीची प्रथा आहे. यंदा मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. सराफ बाजारातील पेढ्यांचे शटर डाऊन असल्याने सोने-चांदी खरेदीची उलाढाल ठप्प झाली आहे.

  • दुचाकीचे गोडावून फुल्ल... पण ग्राहकच नाही

  • चारचाकी गाड्यांचे बुकिंग करूनही कारची डिलेव्हरी घेतली जात नाही. दुसरीकडे दुचाकी शोरूम चालकांनी फेबु्रवारी, मार्चमध्येच पाडव्याची तयारी करत हजारो नव्या दुचाकी कंपनीकडून मागविल्या. कंपनीने बिलिंग करत मोटारसायकली शोरूमला पाठविल्यादेखील. पण आता ग्राहकच नसल्याने दुचाकी शोरूमचालका हवालदिल झाले आहेत. करोडा रूपये गुंतवूनही धंदाच नसल्याने गुंतवणूक व्यर्थ गेल्याची भावना शोरूममालक बोलवून दाखवित आहेत.

  • माझ्या आयुष्यात असा ‘व्हाईट वॉश’ पाडवा कधी पाहिला नाही. 50 टक्के कर्मचार्‍यांवर कारचे रिपेरिंग सुरू आहे. नव्या कार बुकिंग करूनही ग्राहक डिलेव्हरी घेत नाहीत. त्यांच्या मनात लॉकडाऊनची भिती आहे. कोरोना महामारीमुळे अ‍ॅटोबाईल सेक्टर कोलॅप्स झाले आहे. - रितेश नय्यर, संचालक, फोक्सवॅगन

  • 10/12 कारचे बुकिंग होते. मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे कार वेळेत पोहचलेल्या नाहीत. त्यातच ग्राहकही डिलेव्हरी घेण्याला नकार देताहेत. पाडव्याच्या खरेदी मुहूर्ताला शोरूम बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. अ‍ॅटोमोबाईल सेक्टरमध्ये मुहूर्ताचा दिवस पहिल्यादांच बिना उलाढाल जातोय. - धनंजय गाडे, संचालक, फोर्ड.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com