केंद्राच्या 'त्या' अहवालाचा जैन समाजाकडून तीव्र निषेध

केंद्राच्या 'त्या' अहवालाचा जैन समाजाकडून तीव्र निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)

जैन धर्मीयात १४.९% पुरुष व ४.३% महिला म्हणजे जवळपास २०% समाज हा मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या अहवालात दिला असून सदरचा अहवाल हा अत्यंत खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगत ऑल इंडिया जैन सोशल फोरम या राष्ट्रव्यापी संघटनेने या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे.

जैन समाज हा अहिंसेचा पाईक असून अहिंसा ही भगवान महावीरांची शिकवण असून शाकाहार उत्तम आहार हे जैनांचे ब्रीदवाक्य आहे असे असतानाही चुकीचा आणि खोटा अहवाल समाज माध्यमातून जनतेसमोर आणून जैन समाजाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे ऑल इंडिया जैन सोशल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी म्हटले आहे.

ऑल इंडिया जय सोशल फोरमच्यावतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयात पाठवलेल्या निषेध निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, देशभरातील जैन समाज अल्पसंख्यांक असला तरी संपूर्ण देशात व विदेशात असलेल्या बांधवांची संख्या लाखोंच्या घरात आहे असे असताना १६३२ महिला व २८० पुरुष यांना भेटून हा अहवाल तयार करण्यात आला आहे या महिला व पुरुषांना अहवालातील कोण व कधी भेटले व यातील किमान शंभर लोकांची नावे तरी अहवाल बनवणाऱ्यांनी जाहीर करण्याचे आवाहन देखील अभिजीत लुणिया यांनी केले आहे. चार भिंतीच्या आत एअर कंडिशनमध्ये बसून कोणाच्या तरी दबावाखाली बनवलेला हा खोटा अहवाल जैन समाजाला बदनाम करण्यासाठीच बनवला आहे व त्याचे जाहीर प्रकटीकरण केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

केंद्रातील आरोग्य विभागाने अशाप्रकारचा खोटा अहवाल बनवणे व केंद्रीय मंत्रालयाने तो सार्वजनिक रित्या जाहीर करणे हे अत्यंत खेदजनक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. जैन सोशल फोरमने सर्वप्रथम या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे. या निषेध निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह देशातील सर्व पक्षाच्या प्रमुखांना पाठविल्या असून केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच काँग्रेसचे नेते आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांना भेटून सविस्तर निवेदन करणार असल्याची माहिती देखील राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया व राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. प्रितम कोठाडिया, नवी दिल्ली यांनी दिली.

जैन समाज शाकाहाराचा पुरस्कर्ता : फिरोदिया

केंद्रीय आरोग्य विभागाचा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ अहवालात जैन समाजातील नागरिक मांसाहार करीत असल्याचा उल्लेख आहे. या अहवालामुळे जैन समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. जैन समाज हा अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. केंद्राचे हे सर्वेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आले असून याचा सकल जैन समाज निषेध करीत आहे, असे जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल जारी केल्यानंतर जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भगवान महावीरांची जियो और जिने दो ही शिकवण आचरणात आणण्याचे काम समाजाने नेहमीच केले आहे. कोणतीही जीव हत्या जैन धर्माला मान्य नाही. संपूर्ण जगात जैन समाज शाकाहारासाठी नावाजला जातो. असे असताना केंद्र सरकारचा हा अहवाल खोडसाळपणाचा व समाजाच्या भावना दुखावणारा आहे. केंद्र सरकारने तातडीने हा अहवाल मागे घेतला पाहिजे. सर्वेक्षण करताना किती जैन कुटुंबाला संबधितांनी भेटी दिल्या, असा सवालही नरेंद्र फिरोदिया यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com