झेडपीच्या शाळांना हवेत 820 वर्ग खोल्या

पाच वर्षापासून शिर्डी संस्थांचे दहा कोटी पडून; ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
File Photo
File Photo

अहमदनगर (प्रतिनिधी)

अलिकडच्या काही वर्षात नगर जिल्ह्यात झेडपीच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचा विषय यक्ष झाला आहे. शाळांच्या वर्ग खोल्यांसाठी सर्व शिक्षा अभियानातून मिळणार बांधकामाचा निधी आटल्याने आता वर्ग खोल्यांसाठी जिल्हा नियोजन समितीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे सहा ते सात महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या 420 वर्ग खोल्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लाभेला नाही. अशात नव्याने पदभार स्वीकारलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन बैठक घेवून नगर जिल्ह्यातील शाळा खोल्याबाबत काय मार्ग काढणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

नगर जिल्ह्यात विद्यमान परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 820 वर्ग खोल्यांची गरज आहे. धोकेदायक असणार्‍या आणि निर्लेखन झालेल्या वर्ग खोल्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. साधारपणे एका वर्ग खोलीसाठी 9 लाख 50 हजार रुपये खर्च येत आहे. तर दुसरीकडे पाच वर्षापूर्वी शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टने जिल्हा परिषदेला शाळा खोल्यांसाठी 30 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानूसार ट्रस्टने 10 कोटींचा निधी दिला देखील. मात्र, या निधीतून वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने करावयाचे की सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाचे या वादात हा निधी सध्या पडून आहे.

तर सहा ते सात महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून 420 वर्ग खोल्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे. मात्र, त्याची अद्याप निविदा प्रक्रिया झालेली नाही, यामुळे हा निधी देखील पडून असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या 85 ठिकाणी उघड्यावर वर्ग भर असून काही ठिकाणी समाज मंदिर अथवा अन्य ठिकाणी शाळा भरवण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यातील शाळांच्या वर्ग खोल्यांच्या विषयावर दोन दिवसांपूर्वी विधानसभेत चर्चा झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील वर्ग खोल्यांसाठी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शाळांच्या वर्ग खोल्यांसाठी बैठकीची नव्हे, तर निधीची गरज असून 820 वर्ग खोल्यासाठी कोट्यावधी रुपये कसे उपलब्ध होणार हा खरा प्रश्न आहे. याबाबत मंत्री महाजन काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा खोल्यांची मागणी नेवासा तालुक्यात 110 असून त्यानंतर श्रीगोंद्यात 90, जामखेडमध्ये 89, तर सर्वात कमी मागणी श्रीरामपूरमध्ये 35 वर्ग खोल्यांची आहे.

अशी आहे गरज

अकोले 45, संगमनेर 50, श्रीरामपूर 35, श्रीगोंदा 90, शेवगाव 60, राहुरी 44, राहाता 28, पारनेर 34, पाथर्डी 80, नेवासा 110, नगर 50, जामखेड 89, कोपरगाव 75, कर्जत 30 असे आहेत.

मागील पदाधिकार्‍यांनी जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या निधीतून तालुकानिहाय मंजूरी दिलेल्या वर्ग खोल्यात मोठी तफावत आहे. यात तत्कालीन अध्यक्षा यांच्या शेवगाव तालुक्यात सर्वाधिक वर्ग खोल्यांना मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर पारनेर, नगर, संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील सर्वाधिक खोल्यांचा समावेश आहे. यामुळे यापूढे गरज ओळखून वर्ग खोल्यांना मंजूरी मिळावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com