ZP Exam : झेडपी परीक्षेचे भोंगळ नियोजन चव्हाट्यावर! आता 'या' तारखेला लेखी परीक्षा

ZP Exam : झेडपी परीक्षेचे भोंगळ नियोजन चव्हाट्यावर! आता 'या' तारखेला लेखी परीक्षा

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी आधी जाहीर केलेले वेळापत्रक चार दिवसांनी पुढे ढकलले आहे. आता 7 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील परीक्षा होणार आहेत. आधी ही परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये लेखी परीक्षेची तयारी न झाल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाला परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या क वर्ग प्रवर्गातील 935 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या 8 संवर्गासाठी 3 ते 11 ऑक्टोबरदरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रतिक्षा उमेदवारांना असतानाच शुक्रवारी (दि.29) प्रशासनाने आधीचे वेळापत्रक रद्द करून आता 7 ते 11 ऑक्टोम्बर या कालावधीतील सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारही बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, परीक्षा पुढे का ढकली याबाबत कानोसा घेतल्यानंतर नगर सोडून राज्यातील अन्य जिल्ह्यात परीक्षेची तयारी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर राज्य पातळीवरून सर्व जिल्ह्यातील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, आधीच शासकीय विविध पदांच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक विघ्न येत असताना जिल्हा परिषदेची परीक्षाही सुखरूप पार पडेल की नाही याबाबत उमेदवारांकडून शंका उपस्थित होत आहेत.

नगर जिल्हा परिषदेच्या 935 जागांसाठी 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच वेळी या पदांसाठी परीक्षा होत आहे. जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता 7 तारखेच्या परीक्षेचे हॉलतिकीट कधी मिळणार, हाही प्रश्‍न आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या परीक्षा निरोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक

वरिष्ठ सहारक (लेखा) - 7 ऑक्टोबर

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - 8 ऑक्टोबर

विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक - 8 ऑक्टोबर

लघूलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- 11 ऑक्टोबर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com