झेडपी कर्मचार्‍यांची बदल्यांची तयारी पूर्ण

शासनाच्या आदेशानंतरच होणार कार्यवाही
झेडपी कर्मचार्‍यांची बदल्यांची तयारी पूर्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत आणि तालुका अंतर्गत बदल्याची प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यांत होत असते. यंदा करोना संसर्गाचा कहर असल्याने कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी आवश्यक असणारी माहिती तयार करून ठेवली असून शासनाने आदेश दिल्यास बदल्या करण्यात येणार आहेत. अन्यथा जैसे थे ही भूमिका घेण्यात येणार असल्याचे झेडपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या 5 ते 15 मे या कालावधीत बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्हा अंतर्गत आणि तालुका अंतर्गत बदल्याची प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रामविकास विभाग शासन आदेश काढून बदल्याचा रेशो निश्चित करून देतात. साधारणपणे दरवर्षी एकूण कर्मचार्‍यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार 10 टक्के प्रशासकीय आणि 5 टक्के विनंती बदली प्रक्रिया राबविण्यात येते.

यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करून ती प्रसिध्द करत असे. यंदा करोना करोना परिस्थिती असल्याने कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार की नाही याबाबत आतापर्यंत कोणतेच स्पष्ट आदेश नाहीत. मात्र, ग्रामविकास विभागाने कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिल्यास ऐनवेळी अडचण नको यासाठी बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानूसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

अवघे 80 ते 90 कर्मचारी कामावर

वाढत्या करोना संसर्गामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषेदच्या मुख्यालयात 15 टक्के कर्मचार्‍यांना कामावर बोलविण्यात येत आहे. मुख्यालयात 350 कर्मचारी कार्यरत असून त्यातून गरज असणार्‍या कर्मचार्‍यांना त्यात्या विभागाचे प्रमुख कामावर बोलवित आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात 80 ते 90 कर्मचारी दररोज कामावर येत आहेत.

शक्य असल्यास विनंती बदल्या करा

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची करोना संसर्गामुळे बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. आधीच वाढत्या करोना संकटामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटूंब अडचणीत आहे. शासनाने या महामारीत 15 टक्के कर्मचार्‍यांना कामावर बोलविलेले आहेत. यामुळे यंदा कर्मचार्‍यांना बदलीत सुट द्यावी आणि ते शक्य नसल्यास प्रशासकीय बदल्या रद्द करून केवळ विनंती बदली करण्याची मागणी कर्मचारी संघटनेतून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com