झेडपी कर्मचारी अन् त्यांच्या कुटूंबासाठी अद्यावत कोविड सेंटर उभारणार

मुख्य कार्यकारी आणि सर्व कर्मचारी संघटनांच्या बैठकीत निर्णय
झेडपी कर्मचारी अन् त्यांच्या कुटूंबासाठी अद्यावत  कोविड सेंटर उभारणार

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील दहा हजार प्राथमिक शिक्षक हे करोना संबंधित विविध प्रकारच्या ड्युट्या करीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रशासनाकडून पुरविण्यात आलेली नाही. गेल्या दीड महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त शिक्षकांना प्राण गमवावे लागले आहेत. ड्यूटी करणार्‍या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचे आदेश सर्व आरोग्य केंद्रांना बुधवारी देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र अद्यावत कोवीड सेंटर उभारण्यात येणार आहे. यात कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपचार करण्यात करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी घेतला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवारी आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये करोना पेशंटची संख्या वाढत असून अनेकांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील कर्मचारी सुद्धा यात बाधित होत आहेत. त्यांनासुद्धा उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर लवकरच उभारले जाणार आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सुरुवातीला नगरमध्ये एक व नंतर उत्तरेत एक असे दोन सेंटर उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोविड सेंटरसाठी कर्मचारी आपला समप्रमाणात सहभाग देणार आहेत. कर्मचार्‍यांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात निधी उभा करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक करोनाशी संबंधित कामे करीत असून त्यांना लस घेण्यासाठी अनेक आरोग्य केंद्रांवर मज्जाव करण्यात येत असल्याची बाब शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यामध्ये शिक्षक घरोघरी जाऊन करोना बाधितांचा सर्वे करीत आहेत, कोविड सेंटरवर ड्युटी करीत आहेत. पोलिसांना सहकार्य करीत आहेत व इतरही सर्व कामे करीत आहेत. दीड महिन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त शिक्षकांना प्राण गमवावे लागले आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. सदर प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित आरोग्य अधिकार्‍यांना त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करून घेण्याबाबत आदेशित करणारे पत्र लगेच काढण्यात यावे असे आदेश दिले. यावेळी शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्‍नांबाबत प्रामुख्याने मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीत शिक्षक संघटनांच्या वतीने सर्वश्री बापूसाहेब तांबे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, मच्छिंद्र लोखंडे, विजय महामुनी, भाऊसाहेब नगरे, सुनील शिंदे, गौतम मिसाळ, सुभाष कराळे, विकास साळुंखे, एकनाथ ढाकणे, कुंडलिक भगत, एकनाथ राउत व इतर कर्मचारी संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

...................

18 हजार कर्मचार्‍यांना मिळणार लाभ

जिल्हा परिषदेचे पे स्लीपवर काम करणारे 18 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. यात सर्वाधिक 11 हजार प्राथमिक शिक्षक असून त्या खालोखाल ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील लिपीक संवर्गातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांनी समप्रमाणात दर महिन्याला 500 ते 1 हजारांची वगर्णी उभी केल्यास त्यातून नगर शहरात कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी अद्यावत कोविड सेंटर सुरू करता येणार आहे. या 100 बेडच्या सेंटरमध्ये 20 ऑक्सिजन बेडचा समावेश असून येत्या आठ दिवसात हे सेंटर उभे करण्याचा मानस प्रशासनाचा आहे.

......................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com