अहमदनगर (प्रतिनिधी) -

येत्या 1 मे रोजी जिल्हा परिषदेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या 60 व्या हिरक महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन यांनी

भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या आतापर्यंत पदाधिकारी, अधिकारी यांचा मान-सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने आतापासून तयारी सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सुचना अर्थ व पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. अध्यक्षस्थानी झेडपी अध्यक्षा राजश्रीताई घुले होत्या. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशिनाथ दाते, उमेश परहर, मिराताई शेटे, सदस्य संदेश कार्ले, अजय फटांगरे, सुप्रिया पाटील, अनिता हराळ, महेश सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी उपस्थित होते. नगर जिल्हा परिषदेला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या ठिकाणी अध्यक्षांसह अन्य झालेले पदाधिकारी यांनी जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात आपला ठसा उमटविलेला आहे. अशा जिल्हा परिषदेला येत्या 1 मे रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहे. जिल्हा परिषदेचा हे वर्ष हिरक महोत्सवी वर्षे साजरा करण्याची सुचना सभापती गडाख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली.

जिल्हा परिषदेचा हा हिरक महोत्सव साजरा करतांना या ठिकाणी होवून गेलेल्या पदाधिकार्यांचा सन्मान तसेच आयोजित करण्यात येणार्या गौरव समारंभात तत्कालीन सर्व अधिकार्यांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच हिरक महोत्सवी वर्षे म्हणून खास गौरव समारंभाचे आयोजन करण्यात येवून जिल्हा परिषदेच्या वैभवशाली परंपरेसोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कर्मचार्यांंसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सुचना सभापती गडाख यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत.

आकर्षक विद्यूत रोषणाई

जिल्हा परिषदेच्या नगर शहरातील मुख्यालयासह तालुकास्तरावर असणार्या पंचायत समितीच्या इमारतीला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला आहे. तसेच हा समारंभ 2 मेपासून करण्याचा मानस असल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले.