नगर झेडपीत नोकरीचे आमिष दाखवून 54 लाखांची फसवणूक

सांगलीतील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
नगर झेडपीत नोकरीचे आमिष दाखवून 54 लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोघा मुलांना नगर जिल्हा परिषदेत क्लार्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लातूरच्या महिलेची नगरमध्ये 54 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना फेबु्रवारी ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान नगरमध्ये घडली. मनिषा रवीकिरण आदमाने (रा. काळेबोरगाव, ता. लातूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रदीप बजरंग माने (रा. आंधळे, ता. पलूस, जि. सांगली) व त्याच्या साथीदारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक हकीकत अशी, फिर्यादी आदमाने या मुलगा आशिष, राजन आणि सासू सोबत लातूर जिल्ह्यातील कोळेबोरगाव याठिकाणी राहतात. त्यांचे पती रविकिर आदमाने आणि सासरे दामोदर आदमाने हे दोघे झेडपीत प्राथमिक शिक्षक होते. यातील सासरे दामोदर हे 2018 मध्ये मयत झाले तर पती 2021 मध्ये कोविडमध्ये मरण पावले. फिर्यादेचे माहेर असल्याने त्यांचे नगरला हे नगर असल्याने त्यांचे नगरला नेहमी येणे-जाणे होते.

नगरला आल्यावर त्या हॉटेल राऊमध्ये (महात्मा फुले चौक) जेवणासाठी थांबत. फेबु्रवारी 2022 मध्ये त्यांच्या ओळखीच्या अमित वाघमारे यांनी प्रदीप माने (रा. आंधळे, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या सोबत आदमाने यांची ओळख करून दिली.

त्यावेळी माने यांचे मंत्रालयात मोठे वजन असून काही काम असल्यास त्यांना सांगा, ते मार्गी लावून देतील, असे आदमाने यांना सांगितले होते. त्यानंतर एकदा आदमाने यांनी माने यांना माझ्या मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याबाबत माने यांना विचारणा केली. त्यावर माने याने आदमाने यांच्या दोन्ही मुलांना नगर जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी खर्च करावा लागले असे सांगितले. माने याच्यावर विश्वास ठेवून आदमाने यांनी फेबु्रवारीपासून 8 ऑगस्ट 2022 पर्यंत वेळोवेळी त्याला 48 लाख रोख दिले.

यात पहिल्यांदा वाघमारे यांच्यासमोर नगरला पाच लाख रुपये रोख दिले होते. मात्र, नोकरीचे काम होत नसल्याने माने याच्याकडे विचारणा केली असता त्याने मंत्रालयात फेरबदल झाले असून झेडपी ऐवजी आरोग्य खात्यात तुमच्या मुलांचे नोकरीचे काम करून देतो असे माने आदमाने यांना म्हणाला. तसेच त्यासाठी आणखी सहा लाखांची मागणी केली.

दरम्यान, यावेळी माने याने त्यांचे बँक ऑफ बडोदा (सांगली) च्या खात्याचे सहा धनादेश आदमाने यांच्याकडे ठेवण्यास दिले. हे धनादेश सिक्युरिटी म्हणून तुमच्याकडे ठेवावा, असा विश्वास माने यांनी आदमाने यांना दिली. त्यानंतर आदमाने यांनी त्यांच्या बँक खात्यातून आणखी सहा लाख रुपये माने यांना आरटीजीएस केले. मात्र, 54 लाख रुपये घेवूनही माने नोकरीचे काम करत नसल्याचे, तसेच फोन घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर आदमाने यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्याचे त्यांच्या फिर्यादीत नमुद केलेले आहे. आदताने यांच्या फिर्यादीवरून माने याच्या विरोधात कोतवाली पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com