
अहमदनगर (प्रतिनिधी)
जुन्या पेन्शनसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशीअखेर जिल्हा परिषद आणि महसूलच्या 15 हजारांहून अधिक कर्मचार्यांना व्हॉटअपव्दारे कामावर हजर होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच कामावर हजर न होणार्या कर्मचार्यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी महसूल कर्मचार्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे महसूल कर्मचार्यांमध्ये तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात येवून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी कर्मचार्यांनी काळे कपडे घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत व्हॉटअप आणि ऑफलाईन पध्दतीने 14 हजार 194 जिल्हा परिषद कर्मचार्यांना कामावर तात्काळ हजर होण्याच्या तर महसूल विभागाच्या 950 कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यासह गैरहजर असणार्या सर्व शासकीय कर्मचार्यांना त्याच्या विभागाचे प्रमुख अथवा नियुक्त अधिकारी यांच्या सहीने नोटीस बजावण्यात आल्या असून कामावर हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.
दुसरीकडे पहिल्या दिवशी हाताच्या बोटावर सुरू असणार्या शाळापैकी 721 माध्यमिक आणि प्राथमिक शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
नगरमध्ये भरलेल्या शाळा सोडल्या
दरम्यान, संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.17 ) प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरासह नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांनी भरविलेल्या शाळा सोडून देण्यात आल्या. तर सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना संपात सहभाग होवून शाळा बंद ठेवण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, अमोद नलगे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सखाराम गारुडकर, नंदकुमार शितोळे, भाऊसाहेब जीवडे, शिक्षक भारतीचे बाबासाहेब लोंढे, गोवर्धन पांडुळे, दिलीप बोठे, संतोष ठाणगे, राहुल झावरे, नितीन गायकवाड, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद सामलेटी, नंदकुमार हंबर्डे यांनी शुक्रवारी सकाळी शहर व नगर तालुक्रातील विविध शाळांना भेटी दिल्या. शहरातील राष्ट्रीय पाठशाळा, शिशु संगोपन गुगळे हायस्कूल तसेच पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालय व शिंगवे नाईक येथील न्यू इंग्लिश स्कूल भरवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आंदोलक शिक्षकांनी सर्व भरलेल्या शाळा सोडून दिल्या.