पुढील काही दिवस केवळ पावसाच्या हलक्या सरी

जिल्ह्यात अडी लाखांहून अधिक हेक्टवर पेरण्या
पुढील काही दिवस केवळ पावसाच्या हलक्या सरी

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

नगरसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाच्या केवळ हलक्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होणार आहे. 5 आणि 6 जुलैला या दोन्ही विभागांत तुरळक भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 2 लाख 61 हजार 469 (सरासरीच्या 58 टक्के) पेरण्या झाल्या असून पावसाने दडी मारल्याने आणि आणखी काही दिवस तरी त्याला जोर मिळणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतातील बहुतांश भाग आणि उत्तर-पश्‍चिम भागातील राज्यांमध्ये सध्या पावसाने दडी मारली असताना मोसमी पावसाचा देशातील प्रवास राजधानी दिल्ली आणि जवळच्या राज्यांतच रखडला आहे. गेल्या 14 ते 15 दिवसांपासून त्याने कोणतीही प्रगती केलेली नाही. आणखी काही दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे.

मोसमी पाऊस 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने अतिशय वेगाने प्रवास करीत तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि पुढील चार ते पाच दिवसांत निम्म्या भारतात प्रगती केली होती. या काळात राज्यासह इतर भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उत्तर-पूर्व दिशेनेही त्याने वेगाने प्रगती करून हिमालयाच्या पायथ्याशी आणि जम्मू-काश्मीर भागांत 11 ते 14 जूनला धडक दिली. या दरम्यानही देशात बहुतांश भागात पाऊस होता. 19 जूनपर्यंत मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू होती. या दिवशी त्याने दिल्लीत धडक मारली. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि चंडीगड आदी राज्यांच्या काही भागांत त्याने प्रवेश केला होता. उत्तर भागात लवकर पोहोचूनही मोसमी पावसाचा प्रवास सध्या थांबला असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

अशी झाली पेरणी (हेक्टर)

नगर 27 हजार 370, पारनेर 28 हजार 493, श्रीगोंदा 6 हजार 596, कर्जत 39 हजार 310, जामखेड 35 हजार 276, शेवगाव 13 हजार 154, पाथर्डी 24 हजार 378, नेवासा 7 हजार 504, राहुरी 8 हजार 224, संगमनेर 57 हजार 718, अकोले 7 हजार 423, कोपरगाव 908, श्रीरामपूर 3 हजार 64, राहाता 5 हजार 51 एकूण 2 लाख 61 हजार 469 हेक्टवर पेरणी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com