दिवसागणित बदलत आहे जिल्ह्यातील धरणांचे चित्र; जाणून घ्या, कोणत्या धरणात किती साठा

मुळा धरण
मुळा धरण

मुळा धरण ५३ टक्के भरले

कोतूळ (वार्ताहर) - अहमदनगर शहर, एमआयडीसी, नेवासा, राहुरी, पाथर्डीसह अन्य तालुक्यांना वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी ५२.५४ टक्क्यांवर पोहचला होता. त्यात नवीन पाण्याची आवक सुरू असल्याने या धरणातील पाणीसाठा ५५ टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.

पाणलोटात पुन्हा पावसाने जोर धरल्याने कोतूळ येथे गुरूवारी मुळा नदीला छोटा पूर आला होता. मुळा नदी काठावर असलेल्या कोतूळेश्वर मंदिराला पाण्याने वेढले गेले होते.पण काल शुक्रवारी पाऊस कमी झाल्याने पूर ओसरला आहे. गुरूवारी आणखी वाढ होत १९७३२ क्युसेकवर गेला होता. तो काल सायंकाळी १२८७१ क्युसेकपर्यंत खाली आला होता.

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेले मुळा धरण.२६००० दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल शुक्रवारी सायंकाळी १३६६१दलघफू झाला होता. धरणाकडे येणारी आवक लक्षात घेता आज या धरणातील पाणीसाठा ५५ टक्क्याच्या पुढे गेलेला असेल.

कुकडीत ५० टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे धरणात १ जुलै २०२२ अखेर १.६७ टीएमसी (५.६६ टक्के) नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. त्यात पंधरा दिवसांत वरूणराजानं किमया केली. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचला आहे. काल सकाळी एकूण उपयुक्त पाणीसाठा १४००० दलघफूच्या पुढे सरकला होता. १३५०० दलघफू क्षमतेचे सर्वात मोठे डिंभे धरणातील पाणीसाठाही ५० टक्के झाला आहे. या धरणातील पाणीसाठा ६६५५ दलघफू झाला होता. येडगाव धरणातील पाणीसाठा ९१ टक्के आहे.

माणिकडोहही निम्मा भरण्याच्या मार्गावर आहे. पिंपळगाव जोगे धरणाचा मायनस पाणीसाठा होता. त्यातही वेगाने वाढ होत असून तोआता ४० टक्क्यावर गेला आहे. गतवर्षी एकूण पाणीसाठा केवळ ५४३७ दलघफू (१९ टक्के) होता. यंदा या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. येडगाव आणि वडज धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. भात खाचरे, नाले, ओढे व डोंगर उतारावरील पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने धरणांच्या पाणी पातळीत रोज दीड ते दोन टीएमसीने वाढ होत आहे. गत २४ तासांत विक्रमी २९०५ दलघफू पाणी नव्याने जमा झाले आहे. त्यामुळे एकूण उपयुक्त पाणीसाठा १४००० दलघफू च्या पुढे सरकला आहे. काल सकाळपर्यंत येडगावात ६१८, माणिकडोह ३९१, वडज ३४५, पिंपळगावजोगे धरणात२९६ दलघफू तर डिंभेत १२५४ दलघफू नवीन पाणी आले.

भंडारदरा ७० टक्के; निळवंडेतून प्रवरेत पाणी सोडले

भंडारदरा (वार्ताहर) भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोटात आषाढसरींचे तांडव नृत्य केल्याने गत ३६ तासांत १३७३ दलघफू पाणी दाखल झाल्याने भंडारदरातील पाणीसाठा ७८१६ दलघफू (७०.८० टक्के) झाला होता. रात्री उशीरा पाणीसाठा ८००० दलघफूच्या पुढे सरकला होता. तर निळवंडेत ६८४ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे काल सायंकाळी पाणीसाठा ५८४५ दलघफू (७०.१८ टक्के) झाला होता. या धरणातून २३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यात ६५ दलघफू पाणी खर्च झाले.

जोरदार पाऊस होत असल्याने अनेक शेतांचे बांध फुटले आहेत. त्यात काही ठिकाणी भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भातरोपे पाण्यात असल्याने ती सडू लागली आहेत. भंडारदरात गत २४ तासांत तब्बल ७०४ दलघफू पाणी आले.कालही पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरू असल्याने आवक सुरू असल्याने तासागणिक पाणीसाठा वाढत आहे आठवडाभरात भंडारदरात तब्बल ५८४४ दलघफू पाणी नव्याने आले आहे. काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद ६९ मिमी झाली आहे.

गोदावरी नदीच्या विसर्गात चढउतार विसर्ग ३७४४५ क्युसेकवर

राहाता (तालुका प्रतिनिधी) - सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कालही पावसाने मध्यम हजेरी लावली. मात्र पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग काही प्रमाणात घटविले आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने वाहणारा गोदावरीचा विसर्ग ३७४४५ क्युसेकवर आणण्यात आला आहे.

काल दिवसभरात गंगापूरला ४०, गौतमीला २९. कश्यपीला ३१, त्र्यंबकला ३४ तर अंबोलीला ५१ मिमी पावसाची नोंद झाली. काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार पालखेड मधुन १५३६० क्युसेक, दारणा १०६७० क्युसेक, गंगापूर ७१२८ क्युसेक, आळंदीतून ९६१ क्युसेक, कडवातून ३२३३ क्युसेक नविसर्ग सोडण्यात येत होता. भावली १०० टक्के भरल्याने भावलीच्या सांडव्यावरुन दारणाच्या दिशेने दारणा नदीत ९४८ क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. तर गौतमी गोदावरीचा ३०० क्युसेकचा विसर्ग गंगापूर धरणाकडे येत आहे. हे सर्व पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत आहे. त्यामुळे गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने या बंधाऱ्यातुन ३२८२२ क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे.

काल सकाळी ६ वाजता या बंधाऱ्यातुन गोदावरीत ३७४४५ क्युसेक ने विसर्ग सुरु होता. तो दोन तासांनी सकाळी ८ वाजता घटवून ३२८२२ क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग काल सायंकाळी ५ वाजे पर्यंत टिकून होता. त्यात ६ वाजता पुन्हा वाढ करण्यात आली. तो ३७४४५ क्युसेक इतका करण्यात आला. काल सकाळी ६ पर्यंत एकूण २०.१ टिएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत या बंधाऱ्यातून करण्यात आला आहे.

जायकवाडी पासस्टी कडे!

दरम्यान जायकवाडीत काल सायंकाळी ६ च्या आकडेवारी नुसार उपयुक्त पाणीसाठा ६०.१७ टक्के तर मृतसह एकूण साठा ७०.२८ टक्के इतका झाला होता. उपयुक्तसाठा ४६.१ टीएमसी, मृतसह एकूण साठा ७२.२ टीएमसी इतका झाला आहे. काल जायकवाडीत ४२२२१ क्युसेक ने आवक होत होती. जायकवाडीचा उपयुक्तसाठा एक दोन दिवसात ६५ टक्क्यांवर पोहचणार आहे. हे नगर नाशिक जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. अजुन पावसाळा शिल्लक असल्याने जायकवाडी यंदाही पूर्ण क्षमतेने भरण्याची चिन्हे असल्याने जायकवाडी च्या लाभक्षेत्रासह नगर, नाशिक जिल्ह्याची चिंता मिटेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com