
अहमदनगर (प्रतिनिधी)
शहरात कचरा संकलन व वाहतूक करणार्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे.
नवीन विविध प्रक्रिया अद्यापही झाली नसल्याने या संस्थेमार्फत सध्या काम सुरू आहे. मात्र ऑगस्ट महिन्यापासून महापालिकेने या संस्थेची सुमारे पावणेतीन कोटी रूपयांची बिले थकविली आहेत. त्यामुळे संस्थेने काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
संस्थेने यासंदर्भात मनपा आयुक्तांना पत्र दिले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे 2.80 कोटींचे बिल अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांचे पगार, वाहनांसाठी लागणारे डिझेल, देखभाल-दुरूस्ती करणे आदींमध्ये आर्थिक अडचणी येत आहेत.
त्याचा परिणाम शहरातील कचरा संकलन व वाहतुकीवर होऊ शकतो. काम सुरळीत राहण्यासाठी थकीत बिले तत्काळ अदा करावीत. अन्यथा कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेचीच राहील, असे संस्थेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.