अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) येथे आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनात रणगाडा,

इन्फंट्री कॉम्बॅट व्हेइकल, रॉकेट लॉन्चर, अत्याधुनिक बंदूका, मिसाईल, शत्रूला हेरणारी दुर्बिण, लष्कराची अशी विविध आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री विद्यार्थ्यांसह नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली.

भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या येथील मेकॅनाइज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) येथे विजय मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारतीय लष्कराचे सामर्थ्य व क्षमतेची ओळख सामान्य नागरिकांना व्हावी, युवकांना लष्करात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे, राष्ट्र निर्माणात लष्कराचे असलेले योगदान नागरिकांना कळावे, या उद्देशाने हे प्रदर्शन लष्कराने आयोजित केले आहे.

या प्रदर्शनात लष्कराच्या बँड पथकाने देशभक्तिपर गाण्यांवर प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर रणगाडे, लष्कराची वाहने, शस्त्रास्त्रे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्यांना लष्करातील जवानांकडून इन्फंट्री कॉम्बॅट व्हेइकल, अँटी टँक गाइडेड मिसाईल, 84 एमएम रॉकेट लॉन्चर, मोर्टार, लहान व मध्यम रेंजमधील विविध शस्त्रे, सॅटेलाईट वाहने, अशा विविध शस्त्रांची व वाहनांची सविस्तर माहिती देण्यात येत होती.

यानिमित्ताने लष्कराची आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. लष्कराकडे असणारी युद्धसामग्री, सैनिकांचे देशाप्रती असणारे योगदान, लष्कराच्या बँड पथकाकडून सादर करण्यात येणारी प्रात्यक्षिके हे सर्व पाहून विद्यार्थी, नागरिक हरखून जात होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत खुल्या असणार्या या शस्त्र प्रदर्शनाला विविध महाविद्यालयांतील एनसीसी कॅडेट, महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी भेट दिल्या.

भारत पाक युध्दाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नगर येथील एमआयआरसीच्या वतीने आयोजित स्वर्णिम विजय वर्ष सायक्लोथॉन स्पर्धेस कमांडंट ब्रिगोडियर विजयसिंह राणा यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. विविध विभागातील, वयोगटातील महिला व पुरूषांनी यात सहभाग घेतला होता. यात लष्करांचे अधिकारी देखील सहभागी झाले होते.