
अहमदनगर (प्रतिनिधी)
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर असलेला बोर्ड तोडून नुकसान केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक बाळासाहेब कळमकर (रा. भुतकरवाडी) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अजित पवार गटाचे शहराध्यक्ष माणिकराव मुरलीधर विधाते (रा. माळीवाडा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना गुरूवारी (दि. 24) दुपारनंतर घडली असून याप्रकरणी विधाते यांनी शुक्रवारी (दि. 25) पोलिसात तक्रार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर माणिकराव विधाते यांच्या नावाचा बोर्ड होता. तो बोर्ड अभिषेक कळमकर यांनी तोडून-फोडून नुकसान केले असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. कोतवाली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.