'अर्बन'ला पूर्ववत यशोशिखरावर नेऊ

सुवेंद्र गांधी । निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा दावा
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर l प्रतिनिधी

स्व. दिलीप गांधी यांनी अर्बन बँकेसाठी, आपल्या नगरसाठी नेहमीच भव्यदिव्य स्वप्ने पाहिली व ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांच्या अचानक जाण्याने आता ही जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.

नोटबंदी, करप्रणालीतील बदल तसेच नंतर प्रशासकाच्या नियुक्तीमुळे व करोना महामारीमुळे बँकेची आर्थिक स्थिती अन्य सहकारी बँकांप्रमाणेच खालावली. त्यात विरोधकांनी केलेले खोटेनाटे आरोपही बँकेच्या प्रगतीस मारक ठरले. सत्ता आल्यास बँकेला पूर्ववत यशोशिखरावर नेऊ, असे प्रतिपादन सहकार पॅनेलचे प्रमुख सुवेंद्र गांधी यांनी केले.

रविवारी (दि. २८) रोजी होत असलेल्या बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गांधी म्हणाले की, स्व. गांधी यांच्या विचारांना मानणान्या अनेकांनी अर्बन बँकेच्या अनेक जण आमच्याकडे आले. त्यांनी आग्रह धरला की आपण एकत्र येवून निवडणुकीच्या रिंगणात उतरू. त्यांचा आग्रह लक्षात घेवून आमच्या परिवारानेही निर्णय घेतला व मी सहकार पॅनलचे नेतृत्त्व स्विकारले. आमच्या घरातून माझी पत्नी दीप्ती गांधी यांना उमेदवारी दिली. हे करताना स्व. दिलीप गांधी यांच्या समवेत असलेल्या सर्व जुन्या मंडळींचा आशीर्वाद व साथ घेतली.

पाथर्डीतील विजय मंडलेचा यांच्यासारखे स्व. दिलीप गांधी यांचे जुने सहकारी आमच्याबरोबर राहिले. त्यांनी प्रकृती व वयोमनामुळे स्वतः निवडणुक लढविण्यास नकार दिला पण त्यांनी सक्षम उमेदवार आम्हाला दिला. अजय बोरा यांच्यासारख्या अनुभवींना आम्ही साथ दिली. बोरा नुकत्याच झालेल्या अपघातामुळे प्रचारात सक्रिय नसले तरी त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचार करीत आहेत. नेवाशातून सचिन देसरडांसारखे उच्चशिक्षित असलेले तरूण उमेदवार आमच्याकडे आहेत. शेवगाव नगरपरिषदेचे युवा नगरसेवक कमलेश गांधी आमच्याबरोबर आहेत. आधुनिक काळातील फायनान्स क्षेत्राचा अनुभव असलेले राहुल जामगावकर आहेत. जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन राहिलेले व बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेले ईश्वर बोरा आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून स्व. दिलीप गांधी यांच्याबरोबर असलेले माजी व्हाईस चेअरमन अनिल कोठारी, अशोक कटारिया, राजेंद्र अग्रवाल, शैलेश मुनोत, केदारनाथ लाहोटी यांचे सुपुत्र गिरीश लाहोटी, ऍड. संपत बोरा, आमचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे असे अनुभवी, दिग्गज उमेदवारांचा समावेश आम्ही पॅनल मध्ये केला आहे. स्व.गांधीसाहेबांचे जुने सहकारी संगमनेरचे माजी नगराध्यक्ष राधवल्लभजी कासट आपल्यात नाही त्यांचे सुपुत्र अतुल कासट हे पॅनलमधून उमेदवारी करत आहेत. माझे सहकारी मनेश साठे, दिनेश कटारिया, सौ. संगीता गांधी, सौ. मनीषा कोठारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्व. गांधी यांनी सार्वजनिक आयुष्यात जोडलेली नाती आमच्या गांधी परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, नगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह संपूर्ण विखे परिवाराने आमच्या परिवाराशी जुने ऋणानुबंध कायम ठेवले. याशिवाय माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिकाताई राजळे, भाजपचे जिल्ह्यातील जुने जाणते नेते, पदाधिकारी यांनी मला वैयक्तिक खूप प्रोत्साहन दिले.

भाजपचे नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घरी भेट देत अर्बन बँकेच्या उत्कर्षासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली. भाजप व्यतिरिक्त इतर पक्षीयांचाही आमच्या सहकार पॅनलला पाठिंबा व सहकार्य मिळत आहे, असा दावा सुवेंद्र गांधी यांनी केला. आमचे पॅनल ९ नोव्हेंबरलाच जाहीर झाले होते. त्यावेळी निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. पण विरोधकांनी १२ नोव्हेंबरला माघार घेतली. हे काम त्यांनी आधीच केले असते तर उर्वरित ७ उमेदवारांचीही माघार घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता आले असते व खऱ्या अर्थाने निवडणूक बिनविरोध होवून बँकेचा खर्च वाचला असता. बिनविरोध निवडणुकीबाबत विरोधकांनी केवळ माध्यमांतून चर्चा केली. निवडणूक बिनविरोध होत नसल्याने आम्हाला मतदारांपर्यंत जाण्याची संधी मिळाली.

एका विशिष्ट परिस्थितीत पॅनेलची जबाबदारी माझ्याकडे आली. बँकेचे कामकाज, ध्येयधोरणांबाबत निर्णय घेण्यासाठी आमच्या पॅनलमधील अनुभवी, नव्या विचारांचे उमेदवार पूर्णत: सक्षम आहे. सहकार पॅनलने बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसारच काम करण्यास प्रत्येक संचालक कटिबध्द राहणार असल्याने माझा वैयक्तिक बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पक्ष देईल ती जबाबदारी तितक्याच निष्ठेने पार पाडेल, अशी ग्वाही गांधी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com