'अर्बन' वर पुन्हा गांधींचा सहकार

निकालात निर्विवाद वर्चस्व | उद्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड
'अर्बन' वर पुन्हा गांधींचा सहकार

अहमदनगर (प्रतिनिधी)

प्रमुख विरोधी उमेदवारांनी माघात घेतल्याने औपचारिकता ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या निवडणूक निकालावर सहकार पॅनलने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व राखले.

दुपारपर्यंत शहर मतदारसंघातील १० सदस्यांसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल हाती आला. १४ उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघात सहकार पॅनलच्या सर्व १० उमेदवारांनी विजय साजरा केला.

दरम्यान, बँकेचा अधिकृत निकाल बुधवारी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून दुपारी ३ वाजेनंतर नूतन संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे.

नगर शहराच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यावेळी चर्चेत होती. बँक बचाव कृती समितीच्या झेंड्याखाली विरोधकांनी हवा तापवल्याने निवडणूक अटीतटीची होणार, असा कयास होता.

मात्र ऐनवेळी प्रमुख विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी झाली. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. यापैकी ४ जागा सत्ताधारी दिलीप गांधी गटाने बिनविरोध जिंकल्या होत्या. निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने मतदानावरही परिणाम झाला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी अवघ्या ३१.६५ टक्क्यांवर घसरले.

नगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, सुरत आणि अहमदाबाद येथील मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. झाला. प्रथम मंगळवारी सकाळी ९ वाजता नेप्ती चौकातील अमरज्योती मंगल कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ अहमदनगर मनपा व भिंगार कॅन्टॉन्मेंट बोर्ड मतदारसंघासाठी मतमोजणी झाली. या मतदारसंघात १० जागांसाठी १४ जण रिंगणात होते. मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने प्रारंभापासूनच आघाडी घेतली होती. ही आघाडी मतमोजणीच्या तिनही फेऱ्यांमध्ये कायम राहिली. विरोधक ठरलेल्या अपक्ष उमेदवारांना फेरीनिहाय हजारांवर मतेही घेता आली नाहीत. सहकार पॅनेलने आतापर्यंत ४ बिनविरोध जागांसह एकूण १४ जागा जिंकल्या आहेत. या मतदारसंघानंतर सायंकाळपर्यंत राज्य मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल हाती येणार आहे. या मतदारसंघातही सहकारचे वर्चस्व राहिल्यास विरोधकांचा एकही संचालक मंडळावर नसेल. यामुळे सहकार पॅनेलने बँकेवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

अध्यक्षपदी दिप्ती गांधी?

बँकेच्या मतमोजणीत सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतर आता बँकेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता आहे. स्व. दिलीप गांधी यांच्या स्नुषा आणि सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दिली गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. सहकार पॅनलची ओळखच गांधी गट म्हणूनच आहे. सुवेंद्र गांधी यांच्याकडेच सहकार पॅनलची सुत्रे होती. त्यामुळे दिप्ती गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. तर उपाध्यक्षपदासाठी बाबुशेठ बोरा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता अमरज्योती मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दिग्वीजय आहेर सर्वसाधारण सभा घेवून मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजेदरम्यान नूतन संचालक मंडळ अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी बैठक घेईल, अशी माहिती आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com