अर्बनच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार

डिपॉजिट गॅरंटी कॉर्पोरेशन अदा करणार ठेवी
अर्बनच्या ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार
नगर अर्बन बँक

अहमदनगर (प्रतिनिधी)

डिपॉजिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (Deposit Guarantee Corporation) नगर अर्बन बँकेच्या (nagar urban bank) पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याची न तयारी सुरू केली आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर लावलेले निर्बंध लवकर उठणार नाहीत, अशी भिती अर्थ क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

डिपॉजिट गॅरंटी स्कीम कायदा १९६१ चे कायद्यात ३० जून २०२१ ला झालेल्या सुधारणेप्रमाणे ज्या बँकेवर बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ चे तरतुदी अंतर्गत ठेवी काढण्यावर बंधने आली आहेत. तसेच व ज्या बँकेने डिपॉजिट गॅरंटी कॉर्पोरेशनचा प्रिमियम भरलेला आहे, अशा बँकेच्या ठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी कॉर्पोरेशनने अदा करायच्या आहेत. ३० जून २०२१ पूर्वीचे तरतूदीनुसार बँक बंद झाल्यानंतर ९० दिवसांत पैसे परत करण्याची तरतूद होती. आता बंधने लावण्यात आल्यानंतर ९० दिवसांत हे पैसे परत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

नगर अर्बन बँकेवर ६ डिसेंबरला बंधने आली. त्यानंतर ९० दिवसांत म्हणजे ५ मार्च २०२२ पर्यंत हे पैसे ठेवीदारांना मिळणे क्रमप्राप्त आहे. यासाठी ठेवीदारांनी त्यांचे मागणीपत्र (दावे) लेखी स्वरूपात अर्बन बँकेकडे १९ जानेवारी २०२२ पर्यंत द्यायचे आहेत. तर दुसऱ्या दाव्यासाठी ५ मार्चपर्यंत मुदत असून या मागणीसोबत ठेवीदारांची ओळख पटविणारे केवायसी डॉक्यूमेंट द्यायचे आहेत.

डिपॉजिट गॅरंटी कार्पोरेशन हे पैसे अर्बन बँकेकडून नंतर वसूल करेल किंवा नगर अर्बन बँकेचे दुसरे बँकेत विलीनीकरण करून विलीनीकरण झालेल्या बँकेकडून ही रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. यामुळे बँकेच्या ठेवीदारांना सध्या दिलासा मिळणार असल्याचे बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com