अहमदनगर (प्रतिनिधी) - वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या त्या अहवालाशी आपला काडीमात्रही संबंध नसल्याचा निर्वाळा नगरचे एसपी मनोज पाटील यांनी ‘नगर टाइम्स’शी बोलताना दिला. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलेल्या महादेव इंगळे नावाच्या व्यक्तीला आपण कधी पाहिले नाही. तो काळा की गोरा हेही मला माहिती नाही, असेही पाटील यांनी बोलताना सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्याचे रॅकेट असून त्याचा सूत्रधार महादेव इंगळे आहे. राज्यातील 29 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या त्यानुसार झाल्या असा गोपनीय रिपोर्ट गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिला होता. त्याचा हवाला देत हा रिपोर्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे देत सीबीआय चौकशीची मागणी केल्याने राज्यात खळबळ उडाली. शुक्ला यांचा रिपोर्ट लिक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणासह प्रशासकीय पातळीवरही मोठी चर्चा झाली. त्या रिपोर्टमध्ये सध्या नगरचे आणि तत्कालीन सोलापूरचे एसपी मनोज पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ‘नगर टाइम्स’ने एसपी पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पाटील यांनी त्या रिपोर्टशी संबंध नसल्याचा निर्वाळा दिला. रॅकेटचा सूत्रधार म्हणून महादेव इंगळेचे नाव पुढे आल्यासंदर्भात पाटील म्हणाले, मी कधी त्याला कॉल केला नाही, त्याला भेटलोही नाही. मी त्याला ओळखतही नाही. त्याच्याशी माझा कधी संबंधही आला नाही, असे सांगत एसपी पाटील यांनी त्या रिपोर्टशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

रिपोर्टमध्ये भलतंच

सोलापूरला एसपी असलेले मनोज पाटील यांची नगरला बदली झाली. शुक्ला यांच्या त्या गोपनीय रिपोर्टमध्ये पाटील यांची बदली पुणे ग्रामीणला दाखविण्यात आल्याचे समजते. मात्र पाटील नगरला आले. त्यामुळे त्या रिपोर्टनुसार बदल्या झाल्याच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे मुख्य सचिव कुंटे यांनीही शुक्ला यांच्या रिपोर्टप्रमाणे बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

आस्थापना मंडळाच्या शिफारसीनुसारच

दरम्यान राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत शुक्ला यांच्या रिपोर्टसंदर्भात सविस्तर अहवाल दिला आहे. कुंटे यांच्या रिपोर्टमध्ये फेबु्रवारी ते जून 2020 या काळात 13 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. त्यातील चार अपवाद वगळता इतर बदल्या या पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारसीने झाल्याचे म्हटले आहे.