सहकारातील बदलांचा अभ्यासासाठी जिल्हा बँक संशोधन मंडळ नेमणार

आ. बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनानंतर बँकेचा निर्णय
सहकारातील बदलांचा अभ्यासासाठी जिल्हा बँक संशोधन मंडळ नेमणार

अहमदनगर (प्रतिनिधी)

केंद्र आणि राज्य सरकारकडून सहकार कायद्यात करण्यात येणारे बदल, सुधारणा यांचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा बँकेने संशोधन मंडळ नेमावे, या मंडळात सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असावा, या मंडळाकडून सहकारी कायद्यात होणार्‍या सुधारणाची गरज आहे का, सहरकारातील बदलाचे फायदे-तोटे यांचा अभ्यास जिल्हा बँकेने करावा, असे आवाहन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. आ. थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून असे संशोधन मंडळ नेमण्याची घोषणा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी केली.

जिल्हा बँकेच्या 65 व्या सर्वसाधारण सभा नगरला शुक्रवारी सहकार सभागृहात पारपडली. यावेळी आ. थोरात बोलत होते. व्यासपिठावर ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अरूण तनपुरे, सीताराम पाटील गायकर, गणपतराव सांगळे, विवेक कोल्हे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. मोनिका राजळे, माजी आ. नरेंद्र घुले पाटील, अंबादास पिसाळ, अमित भांगरे, अनुराधा नागवडे, आशा तापकिर, प्रशांत गायकवाड, करण ससाणे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, अमित पंडित, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

सुरूवातीला सभेचे अध्यक्ष कानवडे यांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थिती आणि घौडदोडीची माहिती दिली. तसेच भाविष्यात राबविण्यात येणार्‍या योजना आणि उपक्रमाबद्दल सांगितले. बँकेकडे 8 हजार 461 कोटींच्या ठेवी असून भागभांडवल 297 कोटी आहे. बँकेने 5 हजार 337 कोटींची गुंतवणूक केली असून 5 हजार 230 कोटींचे कर्ज येणे बाकी आहे. यंदा बँकेला 50 कोटी 50 लाखांचा नफा झाला असल्याचे कानवडे यांनी सांगितले. तसेच यंदा बँकेच्या कर्मचार्‍यांना 7 टक्के पगार वाढ देण्यात येणार असून कर्मचार्‍यांना 22 टक्के दिवाळीला बोनस देण्यात येणार आहे. रिर्झव्ह बँकेने जिल्हा बँकेला मोबाईल बँकिंगला परवानगी दिली असून लवकरच ती कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पुढे 3 ते 5 लाखांपर्यंत शेतकर्‍यांना शुन्य टक्के व्याजदाराने कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात यासाठी बँकेने पाच कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे कानवडे यांनी सांगितले.

त्यानंतर बोलतांना आ. थोरात म्हणाले की, काही व्यासपिठ आणि संस्था या राजकारणापासून वेगळ्या ठेवल्या पाहिजे. त्याठिकाणी शेतकरी, सामान्य यांना केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. यासाठीच जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आले. मात्र, यात काही ठिकाणी चकमकी झाल्याचे सांगताच एकच हश्या पिकाला. राज्यात ज्याज्या बँकांमध्ये राजकारण झाले, बँकिंगच्या विरोधात निर्णय झाले त्यांची अवस्था काय आहे, हे सर्वजन पाहत आहेत. दुसरीकडे जिल्हा बँक आणि साखर कारखानदारी यांच्यात चांगले नाते असून बँकेने आणि शेतकरी आणि कारखानदारी यात समतोल राखला पाहिजे. संचालक मंडळाने विश्‍वस्त काम करावे, नगरच्या जिल्हा बँकेकडे आज साडे हजारांच्या ठेवी आहेत. संबंधीत ठेवीदारांनी विश्‍वासनाने जिल्हा बँकेत ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यांच्या विश्‍वासाला संचालकांनी पात्र ठरले पाहिजे.

आघाडी सरकारने दोन महिन्यांपूर्वी नियमित कर्जफेड करणार्‍यांसाठी तसेच 2 लाखांपेक्षा जास्त कर्जदारांसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्याची अंमलबजावणी आता जिल्हा बँकेने सुरू करावी, चांगला पाऊस झाल्याने आगामी काळात उसाचे क्षेत्र वाढेल, जागतिक पातळीवरही साखरेला चांगले भाव मिळतील. ऊसालाही चांगला भाव मिळेल. त्यामुळे उत्पादकांनी आता एकरी उत्पादन वाढीसाठी लक्ष केंद्रित करावे, बँकेने 5 लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर लागू करण्याचा विचार करावा, 350 सेवा संस्था आर्थिक अरिष्टात सापडल्या, हे योग्य नाही. सेवा संस्था बँकेचा पाया आहेत त्या भक्कम कराव्यात, अशाही सूचना थोरात यांनी केल्या. बँकेच्या वतीने सोलर पंपासाठी कर्ज देण्याचा निर्णय चांगला असून यासाठी बँकेने पुढाकार घेवून शेतकर्‍यांना कमी किंमतीत सोलर पंप उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

केंद्र सरकारने अर्धा टक्के व्याजदराची सवलत बंद केली, याकडे लक्ष वेधत माजी आमदार मुरकुटे यांनी अण्णासाहेब म्हस्के यांना उद्देशून केंद्रात व राज्यात आता तुमचे सरकार आहे, यामध्ये लक्ष घाला असे आवाहन केले. त्यावर म्हस्के यांनी तुमचेही सरकार आहे असा उल्लेख करताच, मी कोणत्याही पक्षात नाही, ज्याचे सरकार त्याला आमचा डबा जोडला जातो, असे उत्तर मुरकुटे यांनी दिले. त्यावर माजीमंत्री कर्डिले यांनी सरकार आल्याचे त्यांना (म्हस्के) अजून कळालेच नाही, अशी टिप्पणी करताच हास्यकल्लोळ उडाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com