नगरमध्ये महादेवाच्या पिंडीची विटंबना

दोन समाजकंटकांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा
नगरमध्ये महादेवाच्या पिंडीची विटंबना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील माळीवाडा वेशीजवळील कपिलेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीची दोन समाजकंटकांनी विटबंना केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 23) दुपारी हा प्रकार लक्षात येताच शहराचे आ.संग्राम जगताप यांच्यासह शिवसेना, हिंदूत्वादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली.गुन्हा दाखल करून संबंधित समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली.

याप्रकरणी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब भगवानराव पवार (वय 58, रा. बुरूडगाव रस्ता, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गेल्या 20 वर्षांपासून कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. मंदिरातील पुजेकरिता एक वयोवृध्द महिला काम पाहतात. दरम्यान, सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास परेश सुनील लोखंडे हे मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना मंदिरातील महादेवाच्या पिंडीला कोणत्यातरी लोखंडी वस्तूने घासुन विटबंना केल्याचे दिसून आले. त्यांनी अध्यक्ष बाळासाहेब पवार यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

त्यांनी ट्रस्टचे विश्वस्त व इतरांना बोलावून घेतले. त्यांनी मंदिरात पाहणी केली असता सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत मंदिराचे पुजारी वयोवृध्द महिलेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले, ‘गुरूवार किंवा शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास मी मंदिराजवळ असताना मला मंदिराच्या गाभार्‍यात काहीतरी चालल्याचा आवाज आल्याने मी मंदिराच्या गाभार्‍याकडे जात असताना मंदिराच्या गाभार्‍यातून दोन इसम घाईघाईने बाहेर आले, मी त्यांना काय करीत आहात याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला काही नाही आम्ही धार लावित होतो, असे म्हणून ते बाहेर निघून गेले’, असे महिलेने सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com