सोमवारपासून गुरूजींची जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया

रिक्त जागांचा तपशील जमा करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश
सोमवारपासून गुरूजींची जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रियेला सोमवारपासून सुरूवात होत आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची ऐनदिवाळीत धावपाळ सुरू होती. शुक्रवारी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांची बैठक घेवून तालुकानिहाय रिक्त असणार्‍या शिक्षकांच्या जागांचा तपशील तपासून तो सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षानंतर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये होणार्‍या बदल्याबाबत उत्स्कूता आहे. बदली पात्र शिक्षकांची दोन वर्षापासून बदली न झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण होते. दरवर्षी मे महिन्यांच्या शेवटी आणि जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांच्या बदल्या होवून शाळा सुरू होताच शिक्षक बदलीच्या ठिकाणी हजर होत असे. यंदा गुरूजींच्या बदल्या होणार असल्या तरी ऐन शैक्षणिक वर्ष सुरू असतांना बदली झालेल्या शिक्षकांना नेमणुकांचे आदेश देणार? याकडे शिक्षकांचे लक्ष आहे.

सर्वधारण क्षेत्रात दहा वर्षे आणि अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीसाठी पात्र असून त्यांच्या संख्या ही दीड हजारांच्या जवळपास आहे. मात्र, यातून निम्म्यांच्या शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचा अंदाज आहे. त्यातही संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांना आधी प्राधान्य असल्याने एकल कमी सेवा असणार्‍या शिक्षकांची बदलीची शक्यता धूर आहे. यंदाच्या बदल्या या ग्रामविकास विभागाकडून ऑनलाईन होणार आहेत. यामुळे कोणाला कोणाचा खो बसणार याकडे गुरूजींचे लक्ष राहणार आहे. सोमवारी बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आधी अवघड क्षेत्रातील यादी प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. आधी बदल्यांची प्रक्रिया 21 ऑक्टोबरला सुरू होणार होती. मात्र, दिवाळीचे कारण पुढे करत ग्रामविकास विभागाने आता सोमवार (दि.31) पासून बदल्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

प्रमाणपत्रांची पडताळणी आवश्यक

जिल्हातंर्गत होणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी सादर करण्यात येणार्‍या प्रामणपत्रांची पडताळणी करणे आवश्यक झाले आहे. बनावट प्रमाणपत्र सादर करून बदली प्रक्रियेत सहभागी होवू सोय करणार्‍यांमुळे प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल्यासाठी सादर करणार्‍या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com