निवडणुकीसाठी शिक्षक संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

शिक्षक बँकेच्या निवडणुकीला आहे त्या टप्प्यावर स्थगिती
निवडणुकीसाठी शिक्षक संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)

अवघ्या आठ दिवसांवर मतदानाची प्रक्रिया पारपडण्यासाठी सज्ज असणार्‍या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीला आहे त्या टप्प्यावर थांबण्याचे राज्य सरकारच्या सहकार विभाग आणि राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश शुक्रवारी सायंकाळी जिल्हा सहकार विभागाला प्राप्त झाले.

यामुळे जिल्हा शिक्षक बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. दीड वर्षापासून आधी कोविडमुळे आणि आता पूर आणि अतिवृष्टीच्या कारणामुळे स्थगिती मिळाल्याने बँकेच्या निवडणूक रिंगणातील संघटनांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेणार असल्याचे सांगितले.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत दीड वर्षाआधी 1 मार्च 2021 संपलेली आहे. मात्र, कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला तत्कालीन राज्य सरकारने स्थगिती दिल्याने आधीच तिनवेळा बँकेच्या निवडणुकीला खो बसला आणि विद्यमान संचालक मंडळाला दीड वर्षाचा जादा कालावधी मिळाला.

आता कोविडची लाट ओसली असून यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने बँकेच्या निवडणूक कार्यक्रम सुरू होता. यात उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप होवून निवडणुकीत चारही मंडळ प्रचाराच्या तयारीला लागले होते. येत्या 24 तारेखला बँकेसाठी मतदान होणार होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी राज्यातील अतिवृष्टी, पूर, वाहतूकीस अडथळा आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालाचा आधार घेत राज्याच्या सहकार विभागाने पुढील दोन महिने राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका या आहे त्या टप्प्यावर थांबवण्याचे आदेश दिले.

यात नगर जिल्ह्यातील अग्रस्ती साखर कारखान्यांची आणि जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या राजकारणात मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दीड वर्षे आधीच लांबलेल्या बँकेच्या निवडणुकीचा अतिवृष्टीशी काय संबंध, जिल्ह्यातील पर्जन्यमान आधीच कमी असून पावसामुळे जिल्ह्यात अद्याप मनुष्यहानी झालेली नाही. यामुळे शिक्षक बँकेची निवडणूक नियोजित वेळेत व्हावी, यासाठी औरगांबाद खंडपिठात धाव घेणार असल्याची माहिती शिक्षक संघटनाच्यावतीने देण्यात आली.

राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या आदेशानूसार बँकेची निवडणूक सप्टेंबरनंतर झाल्यास त्याचा फटका निवडणुकीतील उमेदवारांना बसणार आहे. यामुळे निवडणुकीत असणार्‍या चारही मंडळाच्यावतीने सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी सहकारात निवडणूकांना स्थगिती देतांना राज्य सरकार ज्या ठिकाणी उमदेवारी अर्ज दाखल आहेत, त्या संस्थांना वगळून अन्य ठिकाणच्या निवडणूका थांबवत होते. मात्र, कोविडपासून राज्य सरकारच्यावतीने सर्व निवडणुकांना स्थगिती देत आहेत. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल आणि मतदान न झालेल्या निवडणूकांना देखील आहे, त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात येत आहे. सरकारच्या निर्णयाचे प्राधिकारणाच्यावतीने पालन करण्यात येत असल्याचे सहकार निवडणूक प्राधिकारणाचे सचिव वसंत पाटील यांनी ‘सार्वमत’शी बोलातांना सांगितले.

बापूसाहेब तांबे गट न्यायालयात जाणार

गुरूमाऊलीमधील सत्ताधारी बापूसाहेब तांबे गटाने राज्य सरकारच्या स्थगितीच्या निर्णयाविरोधात खंडपीठात धाव घेणार असल्याचे सांगितले. आधीच निवडणुकीला उशीर झालेला असून बँकेची निवडणूक वेळत होणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणुकीतील उमेदवार यांना मनस्थाप होणार असून यातून बँकेच्या पैशाचा अपव्यय होणार असल्याचे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.

सरकारसह न्यायालयाला विनंती करणार

राज्याच्या बँकेच्या निवडणुकीला दोन महिने स्थगितीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार आणि न्यायालयाला विनंती करून निवडणूक नियोजन कालावधीत व्हावी, यासाठी विनंती करणार असल्याचे गुरूमाऊलीच्या रोहकले गटाच्यावतीने रावसाहेब रोहकले यांनी सांगितले. यासाठी आमच्या वकीलांशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुरूकुलही खंडपीठात जाणार

जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीला आधीच दीड वर्षे उशीर झालेला आहे. त्यात आता पुन्हा निवडणुकीला स्थगिती देणे बरोबर नाही. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com