शिक्षक बँक निवडणूक : पहिल्याच दिवशी 719 अर्जाची विक्री

पाच उमदेवारी अर्ज दाखल
शिक्षक बँक निवडणूक : पहिल्याच दिवशी 719 अर्जाची विक्री

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेणे आणि अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.

पहिल्याच दिवशी बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍या मंडळ आणि संघटनांनी तब्बल 719 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. तर पाच जणांचे उमदेवारी अर्ज दाखल ही झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्यावतीने देण्यात आली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 24 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.17) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. काल पहिल्याच दिवशी सकाळपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शिक्षक संघटना आणि मंडळांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज विकत नेण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी शिक्षक परिषद आणि गुरूमाऊली मंडळ रावसाहेब रोहकले गटाने 130 अर्ज विकत नेले. तर त्यांच्या गटाच्यावतीने संजय शिंदे यांनी नॉन टिचिंग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह याच मतदारसंघातून शहा अल्ताफ रसूल आणि अमोल गोरक्षनाथ लांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यानंतर गुरूमाऊली बापूसाहेब तांबे गटाच्यावतीने स्वत: तांबे यांनी 21 अर्ज, त्यांचे सहकारी संदीप मोटे यांनी 50 आणि राजू राऊत यांनी 50 अर्ज विकत नेले. तांबे गटाच्यावतीने 121 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. त्यांच्या गटाचे संदीप मोटे यांनी श्रीगोंदा सर्वसाधारण मतदारसंघातून त्यांचे स्वत:चे दोन उमदेवारी अर्ज दाखल केलेले आहेत. याच दरम्यान डॉ. संजय कळमकर यांच्या गुरूकुल मंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे यांनी 121 उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत.

स्वराज शिक्षक संघटनेच्यावतीने सचिन नाबदे यांनी 60 उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर सर्वात जुने मंडळ असणार्‍या सदिच्छा मंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी 120 उमदेवारी अर्ज विकत नेलेले आहेत. यासह काही इच्छुकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत. एका उमदेवारी अर्जाची किंमत 100 रुपये आहे.

शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी उमदेवारी अर्जाची विक्री झाल्याने निवडणुकीत रंगतदार होणार याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे शाळा सुरू झाल्या असून नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झाले असून दुसरीकडे शिक्षक बँकेचे तालुक्या तालुक्यात राजकारण रंगणार आहे. उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमदेवारी अर्ज नेण्यासाठी गुरूवार (दि.23) पर्यंत मुदत असल्याने यांना विक्रमी उमदेवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता जिल्ह्यातील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे.

72 हजारांच्या अर्जाची विक्री

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्जाची किंमत 100 रुपये आहे. पहिल्या दिवशी 719 अर्जाची विक्री झाली असून यामुळे 71 हजार 900 रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा झाले आहेत. उमेदवारी अर्जाच्या विक्रीवरून बँकेच्या निवडणुकीत किती कोटींचा चुराडा होणार याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.

नेत्यांचा मुसोद्दीपणा

शिक्षक नेत्यांनी त्यांनी स्वत: अथवा त्यांच्या प्रमुख विश्‍वासू व्यक्ती यांच्या मार्फत उमदेवारी अर्ज विकत नेलेले आहे. उमेदवारी अर्ज बँकेचा कोणताही सभासद विकत नेवू शकतो आणि सभासद शिक्षकांना सुचक आणि अनुमोदक देवून अर्ज दाखल करू शकतो. मात्र, सर्व मंडळात वाढलेली इच्छुकांची संख्या पाहता सर्व मंडळाचे नेते ज्यांचे ज्यांचे उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या माघारीचा अर्ज आधीच त्यांच्याकडून भरून घेणार आहेत. यातून ऐनेवळी माघारीसाठी अडचण येणार नाही. यातून बँकेच्या निवडणुकीतील सर्वच नेत्यांचा मुसोद्दिपणा समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com