शिक्षक बँक : २५ उमेदवारी अर्ज अपात्र

शिक्षक बँक : २५ उमेदवारी अर्ज अपात्र

८२७ पात्र : १२ जुलैपर्यंत माघार

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ८५२ उमेदवारी अर्जांपैकी शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये २५ अर्ज अपात्र झाले आहेत तर ८२७ जणांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.

सोमवार, २७ जून रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार असून १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिक्षक बँकेसाठी गुरूवारी शेवटच्या दिवशी १४४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण प्राप्त अर्जांची संख्या ८५२ झाली होती.

प्राप्त झालेल्या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. संगमनेर सर्वसाधारण व ओबीसी मतदार संघातून सर्वाधिक प्रत्येकी पाच अर्ज बाद झाले. अपूर्ण ठेव व भागभांडवल, सुचकाची सही नसणे, दुसऱ्या मतदार संघातून अर्ज करणे, अनुमोदक स्वाक्षरी नसणे, प्रतिज्ञापत्रावर सही नसणे, जातीचा दाखल नसणे आदी कारणावरून हे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत.

यंदा निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार असून काही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी १४ तालुक्यांचे १४ सर्वसाधारण मतदारसंघ त्यासोबत महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एनटी, नॉनटिंचीग आणि भिंगार छावणी मंडळ असे मतदारसंघ आहेत. दरम्यान २७ जून रोजी अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर १२ जूलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मतदारसंघनिहाय नामंजूर अर्ज

संगमनेर ५, नगर २, श्रीरामपूर १, जामखेड १, पाथर्डी १, राहुरी १, श्रीगोंदा १, अकोले १, कर्जत १, भिंगार २, अनुसूचित जाती-जमाती १, महिला राखीव ३, ओबीसी ५ अशा २५ अर्जाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com