अहमदनगर | प्रतिनिधी

चाँदबीबी महाल परिसरात काही दिवसांपूर्वी बिबटे आणी बछडे दिसल्याची घटना ताजी असतानाच

शनिवारी सायंकाळी नगर-सोलापूर रोडवर वाटेफळ-साकतच्या शिवेवर बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, रुई छ्त्तीसी येथील संगणक शिक्षक नितीन काकडे हे शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नगरकडे जात असताना वाटेफळ व साकतच्या शिवेवर ते थांबले. यावेळी त्यांना शंभर ते दीडशे मिटर अंतरावर नगर-सोलापूर रस्ता पार करताना बिबट्यांचे दर्शन झाले. यामुळे ते भयभीत होऊन मार्गस्थ झाले. थोडे पुढे आल्यानंतर या घटनेची माहिती वाटेफळ येथील मित्रास सांगितली. या घटनेची माहिती वाटेफळ सह पंचक्रोशीत झाल्यानंतर साकतखुर्द, वाटेफळमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून दवंडी देण्यात आली. बिबट्याच्या धास्तीने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या आठवड्यात रात्रीची वीज असल्यामुळे शेताला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांपुढे या घटनेमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगररांगा बरोबरच बिबट्यांनी आपला मोर्चा आता तालुक्यातील इतर भागाकडे वळवला आहे. नगर तालुक्यातील कापूरवाडी येथील एका वासराचा फडशा पाडल्याची घटना ताजी असतानाच साकतखुर्द -वाटेफळ येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील मल्हारवाडी, वडगाव तांदळी, रुई छत्तीसी, देवळगाव, गुंडेगाव, वाळकी, हातवळन, गुणवडी, या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वाळकी येथील नागरिक रात्री गस्त घालत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रविवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन नागरिकांना खबरदारिच्या उपाययोजना बद्दल माहिती सांगितली. यापूर्वी अनेक ठिकाणी बिबट्यांनी माणसांवर तसेच माणसांवर हल्ले केले आहेत. तालुक्यातील बिबट्यांचा वावर हा शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनला असून तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुराख्यांनी एकत्र जनावरे संभाळावीत, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, तसेच जनावरे शेळ्या बंदिस्त ठेवण्याचे आवाहन केले आहे.

रुईछत्तीसी येथून नगरकडे जात असताना वाटेफळ - साकत शिवरास्त्यालागत थांबलो असता शंभर ते दीडशे मिटरच्या अंतरावर दोन बिबटे जवळच असलेल्या माळाच्या दिशेने जाताना पाहिले. घाबरल्यामुळे लगेच मार्गस्थ होऊन पुढे काही अंतर गेल्यानंतर बिबट्या दिसल्याची माहिती वाटेफळ येथील मित्राला दिली.
नितीन काकडे, प्रत्यक्षदर्शी

साकत -वाटेफळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील गावांमध्ये रात्री दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाची वीज मिळावी यासाठी आत्ता पर्यंत जिल्हा व विभागीय पातळीपर्यंत प्रयत्न केले असून राज्यपातळीवर या प्रश्नाचा पाठपुरावा करणार आहे.
रवींद्र भापकर, उपसभापती नगर तालुका पंचायत समिती