अहमदनगर (प्रतिनिधी) - गरीबांचे हित पाहून त्यांना अल्पदरात रक्त मिळावे यासाठी स्व. शंकरराव घुले यांनी कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात रक्तपेढी सुरू केली. ही रक्तपेढी बंद करण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम करत तसे षडयंत्र रचले गेले. ही रक्तपेढी आठ दिवसांत सुरू करा असे आदेश देतानाच सभापती अविनाश घुले यांनी त्या षडयंत्राचा शोध घेणार असल्याचे सांगितले.

स्व. घुले नगराध्यक्ष असताना त्या काळात उभारलेली शहरातील ती एकमेव रक्तपेढी होती. गरीब रुग्णांना स्वस्तात रक्त मिळत असल्याने ती नावारुपाला आली. पण काही विघ्नसंतोषींना ही रक्तपेढी बंद करण्याचा नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेतलाय. त्यामागे षडयंत्र आहे, त्याचा शोध घेतला जाईल असे सांगत घुले यांनी ही रक्तपेढी आठ दिवसांत सुरू करा असे आदेश दिले.

रक्तपेढीसाठी डीएमएलटीचे पाच, टेक्नीकलचे दोन, नर्स, पीआरओ असा 11 जणांचा स्टाफ लागतो. त्यातील टेक्नीशिएन आणि नर्स महापालिकेकडे आहेत. 7 कर्मचारी उपलब्ध झाल्यास रक्तपेढी पूर्ण क्षमतेने सुरू होईल. राजकारण बाजुला ठेवून ती तातडीने सुरू करा असे घुले यांनी सांगितले. त्यावर आयुक्त शंकर गोरे यांनी रक्तपेढीसाठी तातडीने स्टाफ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत रक्तपेढी प्रमुखांना कार्यवाहीचे आदेश दिले.

बिस्कीटालाही महाग

जानेवारी 2020 मध्ये बीएसएनएलमध्ये रक्तदान शिबीर झाले. काही विघ्नसंतोषींनी त्यानंतर पहाणी घडवून आणली. पहाणीत रक्त घटक विघटन कार्यवाही बंदचे आदेश निघाले. त्यानंतरही रक्तपेढी सुरूच होती. सप्टेंबर 2020 मध्ये शनिशिंगणापूर येथे रक्तदान शिबीर झाले. तेथे रक्तदात्यांना चहा-बिस्कीट देण्याला महापालिकेच्या कर्मचार्याकडे पैसे नव्हते, ही शोकांतिका असल्याचे सांगत त्याबद्दल सभापती घुले यांनी नाराजी नोंदविली.