दहा तालुक्यांत रब्बीची पेरणी संथगतीने

परतीच्या पावसाचा परिणाम : जामखेड, पारनेर, नगर, कर्जममध्ये बरी स्थिती
दहा तालुक्यांत रब्बीची पेरणी संथगतीने

अहमदनगर (प्रतिनिधी)

परतीच्या पावसाने दिलेला दगा आणि टंचाईसदृष्य परिस्थिती याचा मोठा परिणाम रब्बी हंगामीतील पिकांच्या पेरणीवर दिसत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार राहुरी, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात रब्बीच्या पेरणीची गती अत्यंत संथ असून जामखेड, पारनेर, नगर आणि पेरण्याचा वेग बरा कर्जत तालुक्यात पेरण्याचा वेग बरा आहे. मात्र, यात देखील ज्वारी वगळता अन्य पिकांची पेरणी नगण्य असल्याने यंदा खरीप हंगामाचे चित्र बकट असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात चालू वर्षी पावसाची स्थिती सुरूवातीपासून बिकट होती. सुरूवातीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर साधारण दोन महिन्यांचा मोठा खंड देखील पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर त्याचा मोठा विपरित परिणाम होऊन शेतकऱ्यांची उभी पिके करपली. यामुळे जिल्ह्यात सुमारे ११ लाख पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी ९ लाखांहून अधिक शेतकरी खरीप पिक विम्याच्या अग्रीमसाठी पात्र ठरले. जिल्हाधिकारी सिध्दीराम सालिमठ यांनी याबाबतची अधिसुचना काढून विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना एकूण भरपाईच्या २५ टक्के भरपाई करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची भिस्त परतीच्या पावसावर होती. मात्र, परतीच्या पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतीचे चित्र विचित्र झाले आहे. आतपासून अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांच्या गतीवर ते स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात समाधानकारक पाणीसाठा असला तरी जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश झालेले असल्याने जोपर्यंत पाण्याचे आवर्तन सुटणार नाही, तोपर्यंत अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम राहणार आहे. प्रशासनाने मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचे दोन आवर्तन निश्चित केले असले तरी अद्याप रब्बी हंगामाला त्याचा कितपत फायदा होणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गव्हाची ५ हजार हेक्टरवर अवघी ७ टक्के, ज्वारीची ५० टक्के १ लाख ३५ हजार, मका १० हजार हेक्टर ६५ टक्के, हरभरा १ लाख ४० हजार हेक्टर ४० टक्के आदी पिकांची पेरणी झालेली आहे. यात राहुरी, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात अत्यंत कमी असून यातील बहुतांशी तालुके हे पाट पाण्यावर अवलंबून असणारे आहेत. दुसरीकडे नगर आणि पारनेर तालुक्यात १०० टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे असून या ठिकाणी अनेक गावात पेरण्याची स्थिती गंभीर आहे.

यंदा थंडीचे प्रमाण कमी असल्याने त्याचा गहू आणि हरभरा पिकावर परिणाम होतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गहू ऐवजी हरभरा आणि ज्वारी पिकाच्या पेरण्यांना प्राधान्य दिले असून ज्याठिकाणी कमी प्रमाणात पाणी आहे, त्याठिकाणी चारा पिकांना शेतकऱ्यांनी प्रधान्य दिलेले दिसत आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने कृषी आणि पशूसंवर्धन विभागाने नियोजन सुरू केले आहे.

यंदा डिसेंबरअखेर अथवा जानेवारीत टंचाईच्या झळा वाढणार आहेत. जिल्ह्यात चालू वर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने त्याचा गाळपावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. पाऊस नसल्याने यंदा उसाची टंचाई सोबत त्याच्या वजनचा प्रश्न असून चालू वर्षी कमी पाऊस असल्याने नवीन ऊस लागवड देखील रोडवलेली आहे. आतापर्यंत ४५ हजार हेक्टवर नवीन लागवड झालेली असून त्याची टक्केवारी ५० टक्के आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com